आझाद मैदान विकासाचा आता नवा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 02:05 IST2015-04-23T02:05:27+5:302015-04-23T02:05:27+5:30
बहुचर्चित आझाद मैदानाच्या सर्वांगीण विकासाचा नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.

आझाद मैदान विकासाचा आता नवा आराखडा
यवतमाळ : बहुचर्चित आझाद मैदानाच्या सर्वांगीण विकासाचा नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे. जुन्या आराखड्यामध्ये अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या आहे.
आझाद मैदान विकासाच्या मुद्यावर सोमवारी सायंकाळी येथील शासकीय विश्राम भवनात आढावा बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार विजय दर्डा, आमदार मदन येरावार, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत आझाद मैदानाच्या एकूणच विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आझाद मैदानाचा पूर्वीचा मूळ नकाशा व सध्याच्या नकाशाची पाहणी करण्यात आली. जुन्या विकास आराखड्यातील अनेक बाबींवर या बैठकीत आक्षेप घेतला गेला. कुठे लांबी तर कुठे रुंदी कमी करण्यात आली. मैदानाचे मूळ स्वरूप बदलणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश विजय दर्डा यांनी दिले. या मैदानातील समाजविघातक कारवायांचा पाढाच यावेळी वाचला गेला. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी मैदानाला ठराविक वेळेतच खुले करावे. अन्यवेळी हे मैदान सुरक्षेच्या दृष्टीने कुलूपबंद असावे, अशी सूचना मांडली गेली. या मैदानाच्या आत कोणतेही खानपाणाचे दुकान न ठेवण्याचे निर्देश दिले गेले. मात्र विमानतळाबाहेरील दुकानांच्या धर्तीवर चार ते पाच दुकाने काढण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र त्याला वाटपाच्या मुद्यावरून तीव्र विरोध झाला. या उद्यानातील स्वच्छता व वीज पुरवठ्याची जबाबदारी नगरपरिषदेने घेतली आहे. नव्या सुधारणांसह आझाद मैदान विकासाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता रमेश होतवाणी यांना देण्यात आले. लवकरच हा नवा आराखडा तयार होणार असून त्यावर चर्चेसाठी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मैदानाच्या मधात हायमास्ट लाईटचा प्रस्ताव आला. त्याला वीज पुरवठा कुठून करणार, या मुद्यावर बरीच चर्चा झाली. अखेर ही जबाबदारी नगरपरिषदेने घेतली. त्यासाठी महसूल विभागाचाही विचार केला गेला होता. नव्या आराखड्यात आझाद मैदानाला तीन प्रवेशद्वार राहणार आहे. मैदान उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या जातील. या मैदानातील उद्यान आणखी विकसित करण्याची सूचना संजय राठोड यांनी मांडली. यावेळी उद्यान नेमके कुणाचे, असा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा नगर अभियंता पालकर यांनी आम्हाला दहा लाखांचा दंड झाल्याने हे उद्यान नगरपरिषदेचेच, असा दावा केला. मात्र त्यावर दंड झाला म्हणजे नगरपरिषदेची मालकी झाली काय, असा प्रश्न उपस्थित करत संजय राठोड यांनी रेकॉर्ड दाखविण्याची सूचना पालकर यांना केली.
आमदार मदन येरावार यांनी या मैदानाची जबाबदारी नगरपरिषदेकडे देण्याला आक्षेप घेतला होता. कारण आज ४० नगरसेवक आहे. उद्या ६० होतील. हे सर्वच मालक राहणार असल्याने मैदान भाड्याने देताना अडचणी निर्माण होण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.
जयस्तंभ हलविणार
आझाद मैदानातील ऐतिहासिक महत्त्व असलेला जयस्तंभ अगदी मधोमध आहे. आता विकासात त्याचा परिसरही वाढविला गेला आहे. मात्र हा मधातील जयस्तंभ अडचणीचा ठरतो आहे. म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर हा जयस्तंभ आझाद मैदानातच एका बाजूला हलविण्याचा निर्णय बैठकीत झाला. जयस्तंभ हलविल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विकासाच्या नावाखाली सध्या जयस्तंभाच्या झालेल्या स्थितीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. यापेक्षा जुना जयस्तंभ चांगला होता, अशी म्हणण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. जयस्तंभाचा आकार व परिसराचा आणखी विस्तार करू नका, अशी सूचना मदन येरावार यांनी मांडली.
सर्वात उंच ध्वज उभारणार
यवतमाळच्या आझाद मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून येथे राष्ट्रीयत्वाची प्रेरणा देणारा सर्वात उंच तिरंगा ध्वज लावण्याचा मानस लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या प्रस्तावाचे उपस्थित सर्वांनीच उत्स्फूर्त स्वागत केले. हा राष्ट्रध्वज नेमका कोठे लावावा, यावर बराच खल झाला. अखेर नगरभवनाच्या आवारात हा उत्तुंग राष्ट्रध्वज उभारण्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.