कचरुलालजी बरलोटा यांच्या सेवेचा वसा स्वीकारला नव्या पिढीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:27 IST2017-08-26T21:27:10+5:302017-08-26T21:27:28+5:30
जिल्ह्यातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झालेले स्व. कचरूलालजी बरलोटा यांनी व्यवसायनिष्ठेसोबतच सामाजिक योगदानाचीही परंपरा निर्माण केली.

कचरुलालजी बरलोटा यांच्या सेवेचा वसा स्वीकारला नव्या पिढीने
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झालेले स्व. कचरूलालजी बरलोटा यांनी व्यवसायनिष्ठेसोबतच सामाजिक योगदानाचीही परंपरा निर्माण केली. रविवारी २७ आॅगस्ट रोजी होत असलेल्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा मिळाला. तर ट्रस्ट स्थापन करून पुढच्या पिढीनेही त्यांचा सेवेचा वसा कायम जपला आहे.
आई बदामबाई आणि बाबा चंदनमलजी यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन कचरुलालजी बरलोटा यांनी उच्च शिक्षणात मोठी मजल मारली. ज्या काळात सीए म्हणजे काय, हे कोणाला कळतही नव्हते, त्या काळी कचरुलालजी बरलोटा यवतमाळ जिल्ह्यातील पहिले सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट झाले. विठ्ठलराव व्यवहारे, अॅड. नक्षणे आणि अनेक सद्प्रवृत्तीचे स्नेही त्यांनी गोळा केले. अनावश्यक खर्च टाळत दीनदुबळ्यांच्या मुलांना मदत केली. विशेष म्हणजे, ते या मदतीबाबत वाच्यताही करीत नव्हते. कचरुलालजी यांच्या निधनानंतर जेव्हा नारायण सेवा समिती, पांजरापोल, गोरक्षण यांची पत्रे घरी आली, तेव्हाच त्यांची दानशूरता जगापुढे आली. या संस्थांना कचरूलालजींनी देणग्या दिल्या होत्या.
मुलांना अमूकच शिक्षण घे म्हणून त्यांनी हट्ट केला नाही. या स्वातंत्र्यामुळेच आज त्यांची अपत्ये सोनल डॉक्टर, विवेक सीए आणि पियूष डॉक्टर झाले. स्नुषा सपना आणि डॉ. सुरेखा तसेच सीए असलेले जावई मुकेश पारख, ऋतुजा, रोमीत, मानसी, रोहन, पूजा पार्श्व हेही त्यांच्या संस्काराशी बांधीलकी जपतात. कुटुंबीयांनी के. सी. बरलोटा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कचरुलालजी यांची सेवाभावी परंपरा ते पुढे चालवित आहेत, ट्रस्टच्या माध्यमातून निरनिराळी चिकित्सा शिबिरे घेऊन पीडितांची सेवा केली जात आहे.