जिल्हा बँकेची दारव्ह्यातील नवी शाखा गैरसोईची
By Admin | Updated: September 25, 2015 03:06 IST2015-09-25T03:06:29+5:302015-09-25T03:06:29+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या सोईसाठी नव्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला

जिल्हा बँकेची दारव्ह्यातील नवी शाखा गैरसोईची
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या सोईसाठी नव्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला असला तरी प्रत्यक्षात दारव्हा येथील संचालकाच्या जागेत उभी राहत असलेली नवी शाखा गैरसोईची असल्याचा सूर ग्राहकांमधून पुढे आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १२ नवीन शाखांचे नियोजन केले होते. या शाखांना आधीच मंजुरीही मिळाली. यातील आठ शाखा कार्यान्वित झाल्या. उर्वरित चार पैकी पुसद विभागात गौळ व चिखली तर दारव्हा विभागात कामठवाडा व दारव्हा येथे शाखा उघडल्या जाणार आहेत. दारव्हा येथील विभागीय कार्यालय कारंजा रोड स्थित नातुवाडीत आहे. तेथे शाखा कार्यालयही आहे. ग्राहकांच्या दृष्टीने ही जागा सोईची आहे. तेथेच दुसरी शाखाही अपेक्षित होती.
मात्र शहर शाखेचे नाव देऊन ही दुसरी शाखा बँकेचे संचालक शंकरराव राठोड यांच्या जुना दिग्रस रोडवरील मालकीच्या जागेत बांधली जात आहे. तेथे वेलफर्निश हॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. बसस्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही नवी ‘शहर शाखा’ सुरू होणार असली तरी ती सर्वच ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोईची ठरणार आहे.
या शाखा इमारत बांधकामासाठी जिल्हा बँकेतूनच कर्ज घेतले गेले. आता हीच इमारत बँकेला भाड्याने दिली जाणार आहे. नागरिकांचा विरोध असताना केवळ संचालकाच्या आग्रहाखातर जिल्हा बँकेची नवीन शाखा ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोईच्या ठिकाणी बांधली जात आहे. अशाच पद्धतीने आणखी दोन संचालकांनी आपल्या निकटवर्तीयाच्या जागेत शाखा उघडल्याची माहिती आहे. तेथेही बांधकामासाठी बँकेतून कर्ज घेतले गेले. बँकेच्या संचालक पदावर असून अशा विविध मार्गाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतलेल्या या लाभाची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)