नेरचा फुटबॉलपटू चित्रपटात चमकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:50 IST2017-08-26T21:49:53+5:302017-08-26T21:50:08+5:30
फुटबॉलच्या प्रेमापोटी घर सोडून हॉटेलात काम करीत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत जागतिकस्तरावर नेरची मान उंचाविणाºया तरुणाची आता दुसरी इनिंग सुरू होत आहे.

नेरचा फुटबॉलपटू चित्रपटात चमकणार
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर (यवतमाळ) : फुटबॉलच्या प्रेमापोटी घर सोडून हॉटेलात काम करीत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत जागतिकस्तरावर नेरची मान उंचाविणाºया तरुणाची आता दुसरी इनिंग सुरू होत आहे. सैराटफेम नागराज मंजुळे यांच्या ‘विजय स्टिफन द मिरॅकल मॅन’ या चित्रपटात तो फुटबॉलपटूची भूमिका साकारणार आहे. होमकांत सुरंदशे असे या तरुणाचे नाव असून, महानायक अमिताभ बच्चनसोबत अभिनय करण्याची त्याला संधी मिळाली आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेरमध्ये कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी तसे पोषक वातावरण नाही. परंतु होमकांत सुरंदशे या तरुणाने परिस्थतीवर मात करीत फुटबॉल खेळात आपलेच नव्हे तर आपल्या गावाचे नावही चमकविले. वायरमन असलेल्या रामकृष्ण सुरंदशे यांचा होमकांत हा मुलगा शालेय जीवनात त्याने फुटबॉलच्या विविध स्पर्धा गाजविल्या. परंतु नेर सारख्या ठिकाणी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार नाही म्हणून त्याने घर सोडले. नागपूर गाठून तेथे एका हॉटेलात काम करत फुटबॉलचे शिक्षण घेऊ लागला. त्याच्यातील धडाडीचा खेळाडू विजय बारसे यांनी ओळखला. त्याला फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. तेथूनच होमकांतची कारकिर्द फुलली. जर्मनी, आॅस्ट्रेलिया या देशात जाऊन तो खेळला. ब्राजीलमध्ये कोच म्हणून सहभागी झाला. फुटबॉल खेळाबाबत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत नागराज मंजुळे यांनी विजय बारसे यांच्या फुटबॉल खेळावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. ‘विजय स्टिफन बारसे द मिरॅकल मॅन’ हा चित्रपट नागराज मंजुळे तयार करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे. यात होमकांत फुटबॉल खेळाडुची भूमिका साकारणार आहे.
होमकांतने फुटबॉल खेळासोबतच आता चित्रपटातही इनिंग सुरू केली आहे.