नेरचे रुग्णालय रामभरोसे
By Admin | Updated: February 11, 2015 00:12 IST2015-02-11T00:12:05+5:302015-02-11T00:12:05+5:30
तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय रामभरोसे सुरू आहे.

नेरचे रुग्णालय रामभरोसे
नेर : तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय रामभरोसे सुरू आहे. अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर कुठलेही नियंत्रण नाही. त्यांची मनमानी सुरू आहे. योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव खासगीचा आधार घ्यावा लागतो. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
तालुक्यातील ९१ गावातील नागरिकांवर या रुग्णालयामध्ये तत्काळ आणि योग्य उपचार होणे अपेक्षित आहे. दररोज शेकडो नागरिक त्या आशेने या रुग्णालयात येतातही मात्र त्यांची घोर निराशा होते. डॉक्टर मंडळी त्यांच्या सोयीने रुग्णालयात दाखल होतात आणि निघूनही जातात. शिवाय कर्मचारी त्यांच्या विभागाशी संबंधित कक्षात थांबत नाही. परिचारिका आणि इतर कर्मचारी त्यांना वाटेल त्या ठिकाणी बसून असतात. एखाद्या रुग्णाने या परिचारिकेला काही बाबी विचारल्यास त्यांच्यावर खेकसतात. रुग्णालयात गर्दी असली तरीही डॉक्टर निघून जातात.
या रुग्णालयाच्या आरोग्य विभागात दोन आरोग्यसेवक, दोन विस्तार अधिकारी, आरोग्य सम्यक एक, तालुका आरोग्य अधिकारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र हा विभाग बरेचदा रिकामा असतो. बहुतांश कर्मचाऱ्यांचा वेळ पानठेला आणि चहा टपरीवर अधिक जातो.
या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. परंतु कुणीही तेथे राहात नाही. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)