उधारी चुकविण्यासाठी भाच्याने मामाचे घर फोडले, उमरखेडमध्ये दहा लाखांची घरफोडी
By सुरेंद्र राऊत | Updated: December 20, 2022 20:20 IST2022-12-20T20:20:08+5:302022-12-20T20:20:35+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने उधारी चुकविण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केली.

उधारी चुकविण्यासाठी भाच्याने मामाचे घर फोडले, उमरखेडमध्ये दहा लाखांची घरफोडी
यवतमाळ : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने उधारी चुकविण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केली. यातही त्याने शक्कल लढवत वेश्यांतर करून भरदिवसा ४९ तोळे सोने, दोन किलो चांदी व एक लाख रुपये रोख असा नऊ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल नेला. ही घटना १४ डिसेंबरला दुपारी घडली. या घटनेने उमरखेड शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी तांत्रिक बाबी व खबऱ्याचे नेटवर्क वापरून चोराचा माग काढला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्याकडून चोरीतील ९० टक्के मुद्देमाल उमरखेड पोलिसांनी जप्त केला आहे.
अक्षय नामदेव ढोले (२८) रा. सुकळी ता. आर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा यवतमाळातील अभियांत्रिक महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला आहे. अभ्यासातील गतिमंद व उनाडक्या जास्त यामुळे अक्षय अनेकवेळा नापास झाला. त्याने आई, वडिलांच्या नकळत मित्रांकडून पैशाची उधारी केली. दुचाकी व इतर शानशौक करण्यासाठी त्याच्यावर मोठे कर्ज झाले. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अक्षय होता. त्यातच अक्षयचे मामा कैलास हरिभाऊ शिंदे रा. उमरखेड यांच्या मुलीचे लग्न ठरले. त्यासाठी शिंदे यांनी दागदागिन्यांची खरेदी केली. हे दागिने बहिणीला दाखवण्यासाठी त्याचे फोटो पाठविले. यातूनच अक्षयला उधारी चुकविण्याची संधी आहे असे वाटले आणि त्याने चोरीचा बेत आखला.
१३ डिसेंबरला कैलास हरिभाऊ शिंदे हे माहूर येथे लग्नाकरिता गेले. हीच संधी हेरून अक्षय वेश्यांतर करून १४ डिसेंबरला दुपारी मामाच्या घरी पोहोचला. त्याने घराचे दार तोडून आत प्रवेश करत ४८५ ग्रॅम सोने, दोन किलो चांदी, रोख एक लाख असा नऊ लाख ३७ हजार २०० रुपयाचा माल कपाटातून काढला. पैसे घेवून तो गावी परत आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल माळवे, सहायक निरीक्षक प्रशांत देशमुख, संदीप ठाकूर, कैलास नेवकर, नितीन खवडे, अतुल तागडे व सायबर सेलचे सहायक निरीक्षक विकास मुंडे यांनी हाती घेतला. वेळोवेळी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांचे मार्गदर्शन मिळत गेले. यातूनच आरोपी अक्षय ढोले याला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अक्षयला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.