पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By Admin | Updated: January 16, 2017 01:10 IST2017-01-16T01:10:11+5:302017-01-16T01:10:11+5:30
गेल्या काही महिन्यांमध्ये महागाव तालुक्यात छोट्यामोठ्या चोऱ्या व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महागाव : गेल्या काही महिन्यांमध्ये महागाव तालुक्यात छोट्यामोठ्या चोऱ्या व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
महागाव तालुक्यात सध्या मटका, जुगाराच्या केसेस पलिकडे पोलिसांची विशेष काही कामगिरी दिसून येत नाही. बहुतांश पोलीस कर्मचारी मुख्यालयी राहातच नाही. त्यामुळे ते सायंकाळी ६ वाजताच महागाव येथील पोलीस कर्मचारी पुसद व यवतमाळ सारख्या शहरांकडे रवाना होतात. अशा स्थितीत रात्रभर नागरिक डोळ््यात तेल घालून स्वत:च गस्त घालत आहेत. वाढत्या चोऱ्या, घरफोडी, शेतातील अवजारे व माल चोरी या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. तालुक्यातील पाच संवेदनशील असलेल्या ठिकाणी गावठी दारुचे गाळप आणि सुरू असलेले जुगारांचे अड्डे बंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. फुलसावंगी, मुडाणा, काळी टेंभी, सवना आणि कोनदरी येथील पोलीस कार्यकाळ तपासला असता या गावांमध्ये अनेक वेळा अवैध धंद्यातून पोलिसांवरच हल्ले झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. कोनदरी येथे तर एका जमादाराचेच बोट तोडण्यात आले होते. त्या आरोपीला पुढे तीन वर्षांची शिक्षा झाली.
फुलसावंगी येथे व्यापाऱ्यांना धमक्या देणे, दरोडे, खून अशा घटना सातत्याने सुरू आहेत. मुडाणा येथील गावठी दारू गाळपाचे अड्डे नष्ट करण्यासाठी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांना लक्ष घालावे लागले होते. याठिकाणी पुन्हा आता तीच परिस्थिती सुरू झाली आहे. बीट जमादारांची उल्लेखनीय कामगिरी नाही. वर्षानुवर्षे एकच बीट जमादार कार्यरत आहेत. (शहर प्रतिनिधी)