जमिनीच्या योग्य वापरासाठी माती परीक्षण आवश्यक
By Admin | Updated: December 6, 2015 02:27 IST2015-12-06T02:27:42+5:302015-12-06T02:27:42+5:30
शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे.

जमिनीच्या योग्य वापरासाठी माती परीक्षण आवश्यक
हंसराज अहीर : आर्णी येथे जमीन आरोग्य पत्रिकेचे शेतकऱ्यांना वितरण
आर्णी : शेतजमिनीच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून कृषी विभागाच्या सल्ल्याने पिके घ्यावी, असे आवाहन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण आणि शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर्सचे विपणन संचालक अशोक घसघसे, मुख्य महाव्यस्थापक गिरीश भोगले, कृषी विद्यापीठाचे विस्तार व शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले, राजू डांगे, पंचायत समितीच्या सभापती सुनीता राठोड, आर्णी कृउबासचे सभापती जीवन जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, मातीचे संवर्धन संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. तिचे महत्त्व ओळखून वापर केला जावा. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पारंपरिक पीक पध्दतीसोबतच इतर पिकांचाही पर्याय स्वीकारला पाहिजे. प्रत्येकाने मातीपरिक्षण करूनच पीकपध्दती आत्मसात करावी, असे ते म्हणाले.
गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी माती परिक्षण हा शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माती परिक्षणाच्या माध्यमातून सुरुवात आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.आरती फुपाटे, आ. ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, डॉ. पी.जी. इंगोले, डॉ.नितीन खोंडे यांचीही भाषणे झाली. प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. शेतीविषयक विविध माहिती पत्रक आणि पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुनीत मातकर यांनी केले. आभार उपविभागीय कृषी अधिकारी द.रा. कळसाईत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)