मुलांना योग्य प्रोत्साहन देण्याची गरज

By Admin | Updated: May 12, 2014 00:18 IST2014-05-12T00:18:00+5:302014-05-12T00:18:00+5:30

लहान मुलांचे जीवन हिर्‍यासारखे असते. जोहरी त्याला पारखतो, त्यांच्यावर संस्कार करतो. त्यांच्यातील सुप्त गुणांना उचित प्रेरणा आणि प्रोत्साहन देतो.

The need to encourage the children to be properly promoted | मुलांना योग्य प्रोत्साहन देण्याची गरज

मुलांना योग्य प्रोत्साहन देण्याची गरज

यवतमाळ : लहान मुलांचे जीवन हिर्‍यासारखे असते. जोहरी त्याला पारखतो, त्यांच्यावर संस्कार करतो. त्यांच्यातील सुप्त गुणांना उचित प्रेरणा आणि प्रोत्साहन देतो. त्यामुळे पुढे तो हिरा स्वयंप्रकाशित होवून समाजाचा उद्धार करतो. आदर्श नागरिक बनविण्यासाठी मुलांना योग्य आदर्श, प्रेरणा आणि प्रोत्साहानाची गरज असते. विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत मिळालेले योग्य प्रोत्साहन त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी असते, असे प्रतिपादन डॉ.सुरेखा मेश्राम यांनी समता पर्वात केले. समता पर्व महिला आयोजन समितीच्यावतीने येथील समता मैदानातील राजर्षी शाहू महाराज समता परिसरात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी समता मंचावर डॉ.छाया फुले, प्रा.डॉ.सुनंदा वालदे, सुनीता काळे, मंगला दिघाडे, डॉ.लिना खोब्रागडे, माया बोरकर, शिला इंगोले आदींची उपस्थिती होती. डॉ.मेश्राम पुढे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १८-१८ तास अभ्यास करून ज्ञानसंपादन केले. त्यामुळेच त्यांनी दलित, शोषित व वंचितांचा उद्धार केला. नेपोलियन बोनापार्ट, अब्राहम लिंकन, डॉ.आंबेडकर हे प्राप्त परिस्थितीतून पुढे आले. या थोर पुरुषांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या पाल्यांना सनदी अधिकारी बनविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.डॉ.सुनंदा वालदे, डॉ.लिना खोब्रागडे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर प्रकाश खरतडे लिखित ‘सूड’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. दलितांवर झालेल्या जाचक अन्यायाचा वेध घेत, इतिहासाचे स्मरण करून देत प्रकाश खरतडे यांनी ‘शूद्र’ची व्यक्तिरेखा हुबेहुब साकारली. मनूस्मृतीच्या कायद्याने शूद्रांचे जीवन नागविले गेले. डॉ.आंबेडकरांनी मनूस्मृतीची चिरफाड करीत शोषितांना सन्मानाचे जीवन बहाल केले. परंतु पुढे चालून या समाजातील स्वार्थांधांनी चळवळीचे तीनतेरा वाजविले. गटा-तटात विखुरलेल्यांना एकत्र करण्याची आर्तहाक सूड या एकपात्री प्रयोगातून दिल्या गेली. सूडचे कथानक प्रकाश खरतडे यांनी लिहिले आहे. यानंतर चळवळीचे स्मरण करून देणारी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये हर्षदा परोपटे, मिनल पिंगळे, काजल गणेशकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रंगभरण स्पर्धेत उत्कर्षा मानकर, जीवक धवने, गौरव श्रीवास्तव, समृद्धी बोरकर, पृथ्वी बिडकर, सुजल ढाणके तर नृत्य स्पर्धेत मानसी बन्सोड, ग्रेसी घायवान, राहुल गायकवाड यांनी यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेत हर्षदा परोपटे, मिनल पिंगळे, ऐश्वर्या खोब्रागडे यांनी तर वेशभूषा स्पर्धेत रुजवी सोनवने, ज्ञानदीप मनवर, नील कितकर, आर्यन बोरकर बक्षिसाचे मानकरी ठरले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The need to encourage the children to be properly promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.