हेलिपॅड अतिउच्चदाब विद्युत वाहिनीजवळ
By Admin | Updated: May 11, 2017 00:57 IST2017-05-11T00:57:29+5:302017-05-11T00:57:29+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरसाठी बनविण्यात आलेले हेलिपॅड हे अतिउच्चदाब विद्युत

हेलिपॅड अतिउच्चदाब विद्युत वाहिनीजवळ
मुख्यमंत्र्यांचा बाभूळगाव दौरा : पायलटने अभियंत्याकडे नोंदविला होता आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरसाठी बनविण्यात आलेले हेलिपॅड हे अतिउच्चदाब विद्युत वाहिनीजवळ (हायटेंशन लाईन) होते. यावर हेलिकॉप्टरच्या पायलटने तीव्र आक्षेपही नोंदविल्याची माहिती आहे.
नियमानुसार अतिउच्चदाब वाहिनीपासून ३०० मीटर अंतर दूरवर हेलिपॅड असणे बंधनकारक आहे. मात्र बाभूळगावातील त्या हेलिपॅडपासून विद्युत वाहिनीचे अंतर साडेतीनशे मीटर असल्याचा दावा बांधकाम खात्याकडून केला जात आहे. विद्युत वाहिनीजवळ हेलिपॅड का बनविले, ते आणखी दूरवर बनविता आले असते, असे म्हणून पायलटने बांधकाम खात्याच्या एका अभियंत्याकडे आक्षेपही नोंदविला होता, हे विशेष.
बांधकाम खात्याने हेलिपॅडबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविलेल्या नकाशावर चुकीचे अक्षांश व रेखांश दाखविले होते. त्यामुळे हेलिकॉप्टर कदाचित ५० किलोमीटर आधीच उतरले असते. त्यामुळे झेड दर्जा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असता. तीन वेगवेगळ्या हेलिपॅडचे नकाशे गेल्याने संभ्रम निर्माण झाला. हेलिपॅड प्रकरणात झालेल्या चुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आक्रमक असले तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र संथ दिसत आहे.
यापूर्वी १९९५ मध्ये युतीचे सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दौऱ्यातही असाच प्रकार घडला होता.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणी नेमकी चुक कुणाची आणि जबाबदार कोण अशी विचारणा करण्यात आली आहे.