काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार
By Admin | Updated: July 28, 2014 23:46 IST2014-07-28T23:46:18+5:302014-07-28T23:46:18+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या माजी आमदाराने जाहीर सभेत काँग्रेसच्या खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार
अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या माजी आमदाराने जाहीर सभेत काँग्रेसच्या खासदारांचा खरपूस समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर कार्यक्रमात केलेल्या गंभीर आरोपाने उमरखेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. राजीव सातव उमरखेड येथे शेतकरी मुलींना लॅपटॉप वाटपाच्या कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम सुरू होता. महागाव येथे बैठकीचे निमित्त करून काही वेळात ते निघून गेले. त्यानंतर या कार्यक्रमात वसंत साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर यांनी चक्क खासदारांचाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये खासदार सातव यांनी माजी आमदारासह इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कुठल्याही सार्वजनिक कामासाठी लावलेले फोन उचलले नाहीत. आजही ते उचलले जात नाहीत. उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अपमानजनक वागणूक दिली जाते. हिंगोलीचा हा खासदार सर्वसामान्यांचा नाही, त्यांना जनतेशी देणे-घेणे नाही, त्यांना केवळ मुंबई-दिल्लीतच रस आहे. त्यांनी या मतदारसंघातील लोकांचा विश्वासघात केला असा आरोप प्रकाश पाटील देवसरकर यांनी या सभेत केला. त्याच प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत करायची की नाही हे ठरवावे लागेल, असेही प्रकाश देवसरकर यांनी सांगितले. त्यावेळी कार्यकर्ते टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराने काँग्रेसच्या खासदारावर जाहीर सभेत केलेल्या या आरोपाने खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघ काँग्रेसने हिसकावून घेतला. यासाठी राजीव सातव यांनी आपले राजकीय वजन वापरले. राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना आपला हा मतदारसंघ गमवावा लागला. लोकसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील व माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह अनेक नेत्यांनी सातव यांच्या विरोधात काम केले हे सर्वश्रृत आहे. तर आमदार विजय खडसे यांच्या विरोधात खुलेआम दंड थोपटून प्रकाश पाटील यांनी भाजपा उमेदवाराचा प्रचार केला हे उघड आहे. मात्र निवडणुकीपूर्वी उमरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा राजस्थानी भवनमध्ये झाला होता. त्यावेळी सर्व नेते व कार्यकर्ते हजर होते. राष्ट्रवादीला सन्मानाची वागणूक आणि विकासात्मक कामे करताना विश्वासात घेण्याचे राजीव सातव यांनी जाहीर केले. मात्र आता जनतेचा विश्वास घात झाल्याचा आरोप होत आहे.