आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:44 IST2018-10-29T21:44:01+5:302018-10-29T21:44:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.

आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.
आर्णी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जवाब दो पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी विविध घोषणा दिल्या होत्या. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच पडले नाही, असा आरोप त्यांनी केला. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जवाब दो पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यापारी या सर्वांसाठी काहीही ठोस केले नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जात नाही. कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. अनेकांना पीककर्ज मिळाले नाही. बोंडअळीचे अनुदानसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार बेग यांनी केला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वसंतराव घुईखेडकर, नाना गाडबैले, क्रांती धोटे, डॉ.आरती फुपाटे, मनीषा काटे, बाजार समिती सभापती राजू पाटील, पी.जी. राठोड, वर्षा निकम, गोपाल कोठारी, चिराग शहा, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, अंजली खंदार, शेषराव राठोड, रवी नालमवार, राजेंद्र शिवरामवार आदी उपस्थित होते.
पायदळ दिंडी काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ?
काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायदळ दिंडी काढून शेतमालाला रास्त भाव मागितले होते. त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार तर सोयाबीनला पाच हजारांची मागणी केली होती. आता त्यांचेच सरकार असूनही ते गुपचूप का, असा सवाल आमदार ख्वाजा बेग यांनी केला. याचा जाब त्यांनी जनतेला द्यावा, असे आवाहनही त्यांनी दिले.