लग्नातून नवरदेवाच्या बहिणीचे दागिने लंपास
By Admin | Updated: July 15, 2016 02:36 IST2016-07-15T02:36:03+5:302016-07-15T02:36:03+5:30
नवरदेवाच्या बहिणीचे दागिने, रोख रक्कम आणि कपडे असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने

लग्नातून नवरदेवाच्या बहिणीचे दागिने लंपास
धनजची घटना : जानवशावर घडला प्रकार
दाभा (पहूर) : नवरदेवाच्या बहिणीचे दागिने, रोख रक्कम आणि कपडे असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा येथे एका लग्नसमारंभात घडली. चोरट्याने जानवशाच्या खोलीचे कुलूप तोडून ही चोरी केली.
धनज (माणिकवाडा) येथील एका परिवारातील लग्न सोहळा याच गावातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यासाठी नवरदेवाकडील मंडळींसाठी या सभागृहाच्या वरच्या मजल्यावरील खोल्या जानवशासाठी दिल्या होत्या. या ठिकाणी नवरदेवाकडील मंडळींनी आपले साहित्य व बॅगा ठेवल्या होत्या. लग्नसमारंभासाठी या खोलीला कुलूप लावून सर्व मंडळी लग्नात सहभागी झाले. मात्र महिला मंडळींसाठी असलेल्या खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडले.
नवरदेवाची चुलत बहीण वैशाली अविनाश गोंगे (रा. पुणे) यांची बॅग या खोलीमध्ये होती. चोरट्यांनी या बॅगचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोख आणि कपडे असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार काही वेळानंतर वैशाली आपल्या खोलीत गेली असता लक्षात आला. तिने शोधाशोध केली असता काहीही हाती लागले नाही. अखेर या घटनेची माहिती लग्नमंडपात पोहोचली. प्रत्येकजण या घटनेने अचंबित झाला होता. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची तक्रार पोलिसात दाखल झालेली नव्हती. यवतमाळ शहरातही दोन दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभातून महिलेचे दागिने असेच लंपास झाले होते. (वार्ताहर)