नवरात्रीत तंबाखूमुक्तीचा ‘अॅक्शन प्लॅन’
By Admin | Updated: October 12, 2015 02:32 IST2015-10-12T02:32:46+5:302015-10-12T02:32:46+5:30
तंबाखूमुक्त शाळांमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी आता ‘नंबर वन’कडे ...

नवरात्रीत तंबाखूमुक्तीचा ‘अॅक्शन प्लॅन’
अविनाश साबापुरे यवतमाळ
तंबाखूमुक्त शाळांमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी आता ‘नंबर वन’कडे वाटचाल सुरू केली आहे. येत्या नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.
शाळांपासून १०० यार्डपर्यंत कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्याच आधारे राज्य शासनानेही ७ जुलै २०१५ रोजी तंबाखूमुक्त शाळेचे निकष ठरवून दिले. यवतमाळ जिल्हा परिषदेने आतापर्यंत जिल्ह्यातील १६ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन एकत्र येऊन शिक्षकांना मार्गदर्शन दिले जात आहे.
जिल्ह्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करून प्रत्येक शाळेने तंबाखूमुक्त झाल्याचे फलक शाळेत झळकविण्याच्या सूचना आहेत. १३ आॅक्टोबरला मुख्याध्यापकांनी तंबाखूबंदीची नोटीस शाळेत लावावयाची आहे. ‘मास्टर ट्रेनर्स’नी त्याविषयी सर्वांना सजग करावयाचे आहे. १४ आॅक्टोबरला तंबाखू या विषयावर विद्यार्थ्यांची पोस्टर बनविणे आणि घोषवाक्य स्पर्धा घ्यायची आहे. १५ आॅक्टोबरला ‘नो स्मोकिंग’चे फलक लावायचे आहेत. १६ आॅक्टोबरला मुख तपासणी करण्यात येणार आहे. १७ व १८ आॅक्टोबरला गावकऱ्यांना तंबाखू सोडण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. १९ आॅक्टोबरला गटशिक्षणाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना शाळेने तंबाखूमुक्तीसाठी केलेले प्रयत्न कळवायचे आहेत. २० आॅक्टोबरला शिक्षक, विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. २१ आॅक्टोबरला शाळा तंबाखूमुक्त झाल्याचे समारंभपूर्वक घोषित करण्यात येईल. ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक प्रवेशद्वारावर झळकविण्यात येईल.