नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत यादीतून डावलले

By Admin | Updated: May 12, 2014 00:19 IST2014-05-12T00:19:21+5:302014-05-12T00:19:21+5:30

सरुळ अकाली पाऊस आणि गारपिटीने नुकसान होऊनही मदतीतून डावलण्यात आले. याउलट रबीचा पेरा नसलेल्या लोकांना मदत देण्यात आली.

Natural disasters help list | नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत यादीतून डावलले

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत यादीतून डावलले

दिलीप भाकरे - सरुळ अकाली पाऊस आणि गारपिटीने नुकसान होऊनही मदतीतून डावलण्यात आले. याउलट रबीचा पेरा नसलेल्या लोकांना मदत देण्यात आली. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील सारफळी शिवारात घडला. तलाठी, कृषी सहायक आणि सहकारी कर्मचार्‍यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करताना गैरप्रकार केला. नुकसानीचे फेरसर्वेक्षण करून खर्‍या नुकसानग्रस्तांना लाभ द्यावा, अशी मागणी सारफळी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍यांनी शेताची प्रत्यक्ष पाहणी केली नाही. गावातील काही लोकांनी सांगितलेल्या शेतकर्‍यांची नावे नुकसानीच्या यादीत नोंदविण्यात आली. यात खरे लाभार्थी वगळले गेले. ज्यांच्या शेतात रबीचा पेराच नाही, अशा शेतकर्‍यांची नावे गारपीट आणि अकाली पावसाने नुकसान झालेल्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. गहू, हरभरा, तीळ, भाजीपाला आदी पिके असलेल्या शेतकर्‍यांचे सर्वेक्षणात कुठेही नाव नाही. या शेतकर्‍यांचा नैसर्गिक प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला आहे. त्यांना शासनाने घोषित केलेल्या मदतीचा लाभ मिळणार होता. भ्रष्ट कर्मचार्‍यांमुळे या मदतीपासूनही वंचित राहावे, लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना डावलून अपात्र लोकांना मदतीचा लाभ देणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी आणि खर्‍या लाभार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर ५० च्यावर मदतीपासून वंचित शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी बाभूळगाव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, मुख्यमंत्री आदींना पाठविण्यात आल्या आहे. सदर निवेदनावर कार्यवाही न झाल्यास बाभूळगाव तहसीलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Natural disasters help list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.