राष्ट्रवादी बंडखोरीच्या तयारीत
By Admin | Updated: August 18, 2014 23:48 IST2014-08-18T23:48:46+5:302014-08-18T23:48:46+5:30
आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील

राष्ट्रवादी बंडखोरीच्या तयारीत
यवतमाळ : आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. हेवीवेट पदाधिकाऱ्याने गॉडफादरकडून बंडखोरीसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचा दावा केला आहे. तर बँक संचालकांनी एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट दिल्लीत संधान साधले आहे.
जिल्हा मुख्यालयी असलेला यवतमाळ विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. हा एकमेव मतदारसंघ ताब्यात असला की आपोआपच संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करता येतो. पक्ष वाढीसाठीसुद्धा हा जिल्ह्याचा गड समजला जातो. या बाबी हेरूनच राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यवतमाळ विधानसभेवर दावा करत असताना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेतील सत्ता, पंचायत समितीतील सत्ता, नगरपरिषदेतील सत्ता याचा हवाला दिला जात आहे. शिवाय भाजप आणि काँग्रेसमधील असंतुष्टही राष्ट्रवादीच्या दिमतीला राहणार असल्याचा दावा केला जात आहे. आघाडीत हा मतदारसंघ मिळविण्यात यश आले नाहीतर वेळप्रसंगी बंडखोरी करण्याची तयारीही या हेवीवेट नेत्याने केली आहे. त्या अनुषंगाने सर्वांना संपर्क केला जात आहे.
राष्ट्रवादीचा प्रमुख नेताच बंडखोरीच्या तयारीत असल्याचे पाहूण आता या पक्षातील अनेक जण हिच वाट निवडण्याच्या मानसिकतेते आले आहेत. काहींनी तर थेट पक्ष सोडून युतीत घरठाव करण्याची तयारी चालविली आहे. नेत्याच्या पावलावर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी पाऊल ठेवल्यास आगामी विधानसभेत आघाडी धर्म संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका काँग्रेसला अधिक बसेल. (कार्यालय प्रतिनिधी)