नगराध्यक्ष स्पर्धेतून राष्ट्रवादी बाहेर
By Admin | Updated: November 11, 2016 02:07 IST2016-11-11T02:07:37+5:302016-11-11T02:07:37+5:30
यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रचना राजू पाटील यांनी माघार घेतली आहे.

नगराध्यक्ष स्पर्धेतून राष्ट्रवादी बाहेर
यवतमाळ : रचना राजू पाटील यांची माघार, आज अखेरचा दिवस
यवतमाळ : यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रचना राजू पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यांनी आपला नामांकन अर्ज गुरुवारी मागे घेतला.
जिल्ह्यात आठ नगरपरिषदांच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ नगरपरिषदेकडे सर्वाधिक लक्ष लागले आहे. यवतमाळचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव आहे. येथे सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्या सौभाग्यवती कांचन चौधरी यांंना आपला उमेदवार बनविले. भाजपाने विद्यमान नगरसेविकेलाच रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी खासदार उत्तमराव पाटील यांची स्नुषा रचना राजेश पाटील यांनी यवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली होती. परंतु ‘एक मराठा, लाख मराठा’ असा नारा देणाऱ्या समाजातील नेत्यांनी समजूत काढल्याने अखेर रचना पाटील यांनी गुरुवारी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला दिलासा मिळाल्याचे राजकीय गोटात मानले जाते. याशिवाय झरीना अब्दूल गफ्फार या महिला उमेदवारानेसुद्धा आपले नामांकन मागे घेतले. ११ नोव्हेंबर ही नामांकन परत घेण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे शुक्रवारी यवतमाळच नव्हे तर जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांमधील अध्यक्ष व सदस्य पदाच्या शर्यतीत नेमके कोण कोण शिल्लक राहतात, हे स्पष्ट होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेनेच्या माघारीचा प्रश्नच नाही - संजय राठोड
नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा दोनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांंनी मुंबईत केली. परंतु प्रत्यक्ष नगरपरिषद क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. यवतमाळात नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि शिवसेना या दोनही पक्षाचे उमेदवार उभे आहेत. सेनेने उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपाकडून वरच्या स्तरावरून दबाव निर्माण केला जात असल्याची माहिती आहे. त्यासाठी नगरपरिषदेतील भाजपाच्या संख्याबळाचा हवाला दिला जात आहे.
शिवसेनेचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मात्र नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्यासाठी भाजपाकडून कोणताही दबाव असल्याची बाब स्पष्टपणे नाकारली आहे. भाजपाकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे राठोड यांनी सांगितले.
शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांचन चौधरी यांचे पती बाळासाहेब चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही ‘आता माघार घेण्याचा प्रश्नच नाही’ अशा शब्दात या चर्चेला पूर्णविराम दिला. आपल्याकडे किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडे नामांकन मागे घेण्याबाबत प्रस्ताव नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. सेनेची फौज प्रचारासाठी सज्ज असून १२ नोव्हेंबरपासून हा प्रचार प्रारंभ होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.