कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस माघारली

By Admin | Updated: October 21, 2014 22:59 IST2014-10-21T22:59:58+5:302014-10-21T22:59:58+5:30

यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर,

Nationalist Congress Party retreated in the citadel of the workers | कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस माघारली

कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस माघारली

यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर, लोहारा, भोयर, भोसा, पारवा, भारी या केंद्रांवर राहिली. यवतमाळ शहरातील एकूण १०८ मतदान केंद्रांपैकी कुठेच राष्ट्रवादीला मतांचा तीन अंकी आकडा गाठता आला नाही. चिचबर्डी गावात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मते मिळविली. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिली. बोथबोडण, तिवसा, किन्ही या गावातही राष्ट्रवादीला सर्वाधिक मते मिळाली.
पिंपळगावात शिवसेना व त्यापाठोपाठ भाजपाला मतदारांनी पसंती दिली. अपेक्षेनुसार वाघापुरात शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली. डोर्ली, पारवा येथे हत्तीने मजल मारली. लगतच्या गहुली हेटी या गावात मतदारांचा काँग्रेसवर विशेष रोष दिसून आला. तेथे केवळ दहा मते पंजाला मिळाली.
यावेळी काँग्रेसला धडा शिकवायचाच, असा निर्धार गहुलीतील बंजारा समाज बांधवांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला. अकोलाबाजार परिसरात सर्व प्रमुख पक्ष बरोबरीने चालल्याचे दिसून आले. लोणी या गावात शिवसेना आणि भाजपाला सर्वाधिक मते मिळाली. तेथे काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर राहिली.
यवतमाळ शहरात बहुतांश भागात शिवसेना आणि भाजपानेच मते घेतली. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी मायनस ठरले आहे. भाजप नेत्याचे गाव असलेल्या आकपुरी येथे तीनही केंद्रांवर शिवसेनेची आघाडी राहिली आहे.
तेथे काँग्रेस दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राष्ट्रवादीला तेथे केवळ चार मते मिळाली.
गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळ शहरात सर्वाधिक माहोल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असताना हा पक्ष प्रत्यक्ष मतदानात एवढा माघारलाच कसा, याचे कोडे राजकीय तज्ज्ञांनाही सुटेलेले नाही. एक तर राष्ट्रवादीकडे दिसणारी गर्दी प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत करण्यात नेत्यांना अपयश आले असावे किंवा केवळ गर्दी दाखविणाऱ्या या कार्यकर्त्यांची जनमानसात किंमत नसावी, असा तर्क लावला जात आहे.
यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी भाजपाच्या प्रस्थापित उमेदवाराला ५२ हजार ४४४ एवढी प्रचंड मते घेवून जोरदार टक्कर दिली. ढवळेंना समाजातून प्रचंड सहानूभूती मिळाली. ५२ हजारांवरील मते ही ढवळेंच्या कार्याची पावती मानली जात आहे. त्यांचा अवघ्या एक हजार २०० मतांनी झालेला पराभव लक्षात घेता पक्षाचे या मतदारसंघात प्रयत्न कमी पडल्याचे दिसून येते.
नियोजन, पैसा, प्रचार सभा, नेत्यांचा संपर्क-पुढाकार, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न या सर्वच बाबतीत दुय्यम ठरूनही ढवळे यांनी ५२ हजार मते घेतआपली समाजकार्याची ताकद पक्षाला दाखवून दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Congress Party retreated in the citadel of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.