नेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
By Admin | Updated: December 30, 2016 00:15 IST2016-12-30T00:15:11+5:302016-12-30T00:15:11+5:30
तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.

नेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
अनेकजण सोडचिठ्ठीच्या तयारीत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर परिणाम
किशोर वंजारी नेर
तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्याच्या परिस्थितीत कमकुवत झाली आहे. अनेक पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारीसुद्धा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षातून जाणाऱ्यांचा वेग अशाच प्रकारे कायम राहिल्यास याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर निश्चित होणार आहे. याचा फायदा विरोधी पक्षांना मिळणार आहे.
एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्या या परिस्थितीत का पोहोचली आहे, याबाबत आत्मपरिक्षण करण्याची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीची स्थापना केली. धुरंदर वलय असलेल्या पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची स्थिती भक्कम केली. याचवेळी शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राजकारण करणारे बाबू पाटील जैत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन नेर तालुक्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करून राष्ट्रवादीचे वलय निर्माण केले. गावागावात सक्रिय कार्यकर्ते निर्माण केले. तालुक्यात राष्ट्रवादीचा पहिला नेता म्हणून बाबू पाटील यांचेच नाव आजही घेण्यात येते. दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून उत्तमदादा पाटील गटाचे वसंतराव घुईखेडकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नेतृत्त्व कुणाचे यावर खल सुरू झाला. बाबू पाटील जैत यांना न सांगताच अनेक निर्णय होवू लागले. जैत यांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ज्यांनी राष्ट्रवादीला तालुक्यात भक्कम स्थिती निर्माण करून दिली, त्यांनाच डावलण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू राहिली. ा्रचंड गट-तट, हेवे-दावे तालुक्यात सुरू झाले. मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हवी तशी पकड नाही. बाबू पाटलांचा मोठा गट शिवसेनेच्या वाटेवर गेल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली व दर्जेदार अशा कार्यकर्त्यांची फौजही कमी झाली. उलट विधानसभा निवडणुकीत ही पोकळी लक्षात आली. मूठभर कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंहगर्जना करणारे राष्ट्रवादीचे नेते भुईसपाट झाले. नेर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट आहेत. एकोपा संपला आहे. सहकार क्षेत्रातील पकडही आता ढीली झाली आहे. एकेकाळी काँग्रेससोबत सहकार गाजविणारे राष्ट्रवादी आता कुण्या दालनात बसेल हे सांगता येत नाही. पक्षश्रेष्ठींनी राकाँची ही अवस्था लवकरच दूर न केल्यास राष्ट्रवादीची स्थिती अतिशय दयनीय होणार आहे. शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. उल्लेखनीय म्हणजे एकही बॅनर शहरात कुठेही लागले नव्हते. त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीविषयी किती प्रेम आहे, याबाबतची चर्चा जिल्हाभर रंगत आहे.