राष्ट्रीय महामार्ग घोषणेवरच
By Admin | Updated: May 10, 2015 01:56 IST2015-05-10T01:56:47+5:302015-05-10T01:56:47+5:30
केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला.

राष्ट्रीय महामार्ग घोषणेवरच
वणी : केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. मात्र केवळ महामार्गाची घोषणाच करण्यात आली. अद्याप या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही. विशेष म्हणजे करंजी ते या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामालाही महामार्ग घोषित होऊनही वेग आला नाही.
केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. या महामार्गाची सुरूवात जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील करंजीपासून होणार आहे. हा मार्ग पुढे वणी, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, धानोरामार्गे नजिकच्या छत्तीसगड राज्याला जोडला जाणार आहे. देशातील हा ९३0 क्रमांकाचा महामार्ग असणार आहे. तो २८0 किलोमीटरचा महामार्ग राहणार आहे.
या महामार्गाच्या २८0 किलोमीटरपैकी ४0 किलोमीटरचा मार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे. त्यात करंजी ते पाटाळापर्यंतचे अंतर समाविष्ट आहे. विशेष म्हणजे सध्या याच करंजी ते घुग्गुस-चंद्रपूर मार्गाचे रूंदीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. याच मार्गातील करंजी-मारेगाव ते वणी हा मार्ग नवीन राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट आहे. त्यामुळे रूंदीकरणाचे रखडलेले काम त्वरित मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप महामार्ग घोषित होऊनही या मार्गाच्या रूंदीकरणाने अद्याप वेग घेतला नाही.
नवीन राष्ट्रीय महामार्गात करंजी ते वणी आणि समोर पाटाळा पुलापर्यंतचा रस्ता समाविष्ट आहे. सध्या करंजी ते मारेगावपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. करंजी ते मारेगावदरम्यान टप्प्याटप्प्याने रूंदीकरण सुरू आहे. काही ठिकाणडी हा मार्ग प्रचंड खडतर झाला आहे. रस्त्यावर केवळ गिट्टीच दिसून येत आहे. मारेगाव शहरात आता रूंदीकरणासाठी झाडे तोडण्यात आली आहे. मात्र रूंदीकरणाला सुरूवात झाली नाही. नजिकच्या काळात या रूंदीकरणाला गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिक व वाहनधारक व्यक्त करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)