राष्ट्रीय फुटबॉलपटू पोलीस देतोय मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: February 3, 2015 23:01 IST2015-02-03T23:01:56+5:302015-02-03T23:01:56+5:30
राष्ट्रीयस्तरापर्यंत फुटबॉलचे मैदान गाजविणारा पोलीस खात्यातील उमदा खेळाडू आज नियतीपुढे हतबल झाला आहे. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा खेळाडू आता मृत्यूशी निकराची झुंज देत आहे.

राष्ट्रीय फुटबॉलपटू पोलीस देतोय मृत्यूशी झुंज
सतीश येटरे - यवतमाळ
राष्ट्रीयस्तरापर्यंत फुटबॉलचे मैदान गाजविणारा पोलीस खात्यातील उमदा खेळाडू आज नियतीपुढे हतबल झाला आहे. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा खेळाडू आता मृत्यूशी निकराची झुंज देत आहे. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. अशा स्थितीत उपक्रमासाठी लाखो रुपये गोळा करणारे खात्यातील वरिष्ठ अधिकारी त्याच्या उपचारासाठी पाठ फिरवित आहे. हातून चाललेला जीवनाचा सामना जिंकण्यासाठी त्याला हवे आहे आर्थिक मदतीचे बळ.
यवतमाळच्या पोलीस दलातील हरहुन्नरी खेळाडू म्हणून निकेश रामचंद्र जयस्वाल (३५) याचा लौकिक आहे. अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस संघात त्याने बजावलेली कामगिरी खात्याला नावलौकीक देऊन गेली. राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील अनेक सामने जिंकुन दिले. यवतमाळच्या सुरज नगरातील निकेश पोलीस दलाची मान उंचावित होता. विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे बंदोबस्तावर होता. त्यावेळी त्याच्या पाठीत अचानक कळा यायला लागल्या. तात्पुरते उपचार करून तो यवतमाळात पोहोचला. नागपूर येथे उपचारादरम्यान त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा तर निकेशवर आभाळच कोसळले. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दीड वर्षीय चिमुकला असे सगळ्यांचे भवितव्य त्याला अधांतरी दिसू लागले. मात्र डॉक्टरांनी त्याला धीर दिला. किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय पुढे ठेवण्यात आला. कुटुंबातील सदस्यांची किडनी देण्याचा निर्णय झाला. अखेर तपासणी दरम्यान आईची किडनी निकेशला देण्याचे ठरले.