नरेंद्र मोदींचे ‘फाईव्ह एफ’ उगवलेच नाही ; दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:28 IST2017-12-12T10:28:19+5:302017-12-12T10:28:41+5:30

नरेंद्र मोदींचे ‘फाईव्ह एफ’ उगवलेच नाही ; दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ व्यर्थ
राजेश निस्ताने ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन असा ‘फाईव्ह एफ’चा विकास मंत्र दिला होता. परंतु भाजपा सरकारची तीन वर्षे लोटूनही हे ‘फाईव्ह एफ’ उगवलेले नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देशात तीन ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतले होते. गुजरातमधील कार्यक्रमात चांगले प्रशासन तर दिल्लीतील कार्यक्रमात महिला सुरक्षा व स्वावलंबनाचे आश्वासन दिले होते. ‘चाय पे चर्चा’चा तिसरा कार्यक्रम चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातील दाभडी (ता. आर्णी जि. यवतमाळ) गावात २० मार्च २०१४ रोजी आयोजित केला होता. सॅटेलाईटमार्फत देशभरातील १५०० प्रमुख शहरांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करून मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी आणि विशेषत: कापूस उत्पादकांशी ‘लाईव्ह’ संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘फाईव्ह एफ’ हा आपला शेतकऱ्यांच्या विकासाचा मंत्र असल्याचे सांगितले होते. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकत असल्याने हा कापूस थेट विदेशात पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन ही पंचसूत्री सांगितली होती. या माध्यमातून शेतकºयांना शेती खर्चाच्या ५० टक्के नफा, पीक विमा हप्ता भरण्यासाठी कर्ज, मोठ्या प्रमाणात सूत गिरण्या, कापड गिरण्या उभारणी, कमी व्याजात जास्त कर्ज, शैक्षणिक कर्जाची शासकीय हमी आदी घोषणा केल्या होत्या. खुद्द भावी पंतप्रधानच आपल्या गावात येऊन घोषणा करीत असल्याने कर्ज व नापिकीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
दाभडीची अवस्थाही ’जैसे थे’
ज्या दाभडी गावातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांच्या विकासाची घोषणा केली, त्या दाभडी गावातही भाजपाला विकासाचा सूर्य उगविता आलेला नाही. मोदींची घोषणा किती खरी किती खोटी हे दाभडीच्या अवस्थेवरून सिद्ध होते. जेथून घोषणा झाली ते दाभडी गाव भाजपा आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहे, हे विशेष.
तीन वर्षे लोटूनही कशाचाच थांगपत्ता नाही
केंद्रात भाजपा सरकारला तीन वर्षे होत असतानाही अद्याप कुठेच कापसावरील प्रक्रिया उद्योग, कारखाने, कापड गिरण्या, सूत गिरण्या यापैकी कशाचाच थांगपत्ता नाही. कापूस उगवला पण नरेंद्र मोदींचे हे ‘फाईव्ह एफ’ उगवले नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून ऐकू येत आहे. कमी दरात खते-बियाणे, पूर्ण वेळ वीज, शेतमालाला भाव, उद्योगांच्या माध्यमातून युवकांना रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार फेल ठरले आणि शेतकऱ्यांचीही घोर निराशा झाली.
दाभडीतील ‘चाय पे चर्चा’वर ७० कोटी खर्च झाले. मात्र मोदींच्या घोषणेतील ‘पाच एफ’ अजून दिसलेच नाही. मोदींची ही घोषणा ‘चुनावी जुमला’ ठरली. त्यांच्या घोषणा आणि ‘मन की बात’ केवळ पब्लिसिटी स्टंट ठरल्या. निराधार योजनेत काँग्रेसने ६० चे ६०० केले मात्र भाजपाला त्यावर एक रुपयाही वाढविता आलेला नाही. नोटाबंदी व जीएसटीचा निर्णय घाईने व अभ्यासाशिवाय घेतला गेल्याने तो पूर्णत: सामान्य जनतेवर उलटला.
- अॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री