महावीरनगरातील नागरिक भोगताहेत नरकयातना
By Admin | Updated: July 23, 2014 23:50 IST2014-07-23T23:50:08+5:302014-07-23T23:50:08+5:30
करापोटी हजारो रुपये वसूल करत असतानाही नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. २५ ते ३० वर्षांपासून निर्माण झालेल्या

महावीरनगरातील नागरिक भोगताहेत नरकयातना
यवतमाळ : करापोटी हजारो रुपये वसूल करत असतानाही नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकडे शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. २५ ते ३० वर्षांपासून निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये साध्या नाल्याही नाहीत. सांडपाणी भररस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. शिवाय रस्त्याची समस्याही गंभीर आहे. वाहन चालविणे तर दूर पायदळ चालणेही या भागातून कठीण झाले आहे. वॉर्डाशी संबंधित सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा वाचल्यानंतरही होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.
या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या महावीरनगरातील नागरिकांनी सदस्य विक्की राऊत यांच्यासह सरपंच, ग्रामसेवकांकडे रस्ता, नाली आणि पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अजूनही या समस्या निकाली काढण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. नाल्या नसल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जात आहे. जागोजागी डबके साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे.
या भागातील बहुतांश रस्ते पायदळ चालण्यायोग्यही नाही. काही वर्षांपूर्वी झालेले संपूर्ण डांबरीकरण उखडले. यानंतर कधीही रस्ता दुरुस्तीची तसदी ग्रामपंचायतीने घेतली नाही. लोकप्रतिनिधींच्या निधीतून झाली तेवढी कामे करण्यात आली. परिणामी रस्त्यावर पडलेले खड्डे कित्येक वर्षांपासून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. वाहनाने जायचे झाल्यास संपूर्ण शरीर खिळखिळे होते. पायदळ चालणे म्हणजे जीवावर उदार होणे होय. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु निधी नसल्याचे कारण सांगत समस्याग्रस्त नागरिकांना वाटी लावल्या गेले.
सदर भागातील नागरिक कराचा भरणा नियमित करतात. त्यांना परिसरातील समस्या सोडविण्याची आशा आहे. पण गेली २५ ते ३० वर्षांपासूनचा समस्यांचा वनवास सुटला नाही. पावसाळ्यात तर प्रचंड हाल होतात. ही बाब माजी आणि विद्यमान सरपंच, सचिवांकडे मांडण्यात आली. त्यांनी केवळ आश्वासने दिली. आश्वासन प्रत्यक्ष केव्हा पूर्ण होईल याची प्रतीक्षा आहे.
ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनावर प्रवीण शहाकार, मंगेश सोईतकर, पद्माकर सावळकर, राजेश सोईतकर, मिलिंद कहाते, बबन कहाते, अनंत राजूरकर, विनोद विठाळकर, नरेंद्र शेळके, बबनराव पोहरे, संध्या चौधरी, राजेश काळे, किरण चिव्हाणे, अनिल चानेकर, सुनील सावजी, कापशीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)