सभापतिपदाकरिता दोन सदस्यांची नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:20+5:30
सर्व समीकरण पाहता दोन महिलांच्या नावांची अधिक चर्चा आहे. तर उपसभापती पदाकरिता दोन पुरुष सदस्यांचा पर्याय आहे. यापैकी कुणाची निवड केली जाते की या पदाची संधीसुद्धा महिलेला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दहा सदस्यीय दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ सदस्य आहे. त्यामुळे पदाधिकारी याच पक्षाचे होणार हे निश्चित आहे.

सभापतिपदाकरिता दोन सदस्यांची नावे चर्चेत
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. सभापतीपदाचे आरक्षणसुद्धा जाहीर करण्यात आले. त्यामुळे लवकरच सभापती, उपसभापती पदांची निवडणूक होईल.
या ठिकाणी शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. या दोन्ही पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गात निवडून आलेल्या पाचही महिला सदस्य दावेदार आहे. मात्र सर्व समीकरण पाहता दोन महिलांच्या नावांची अधिक चर्चा आहे. तर उपसभापती पदाकरिता दोन पुरुष सदस्यांचा पर्याय आहे. यापैकी कुणाची निवड केली जाते की या पदाची संधीसुद्धा महिलेला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दहा सदस्यीय दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ सदस्य आहे. त्यामुळे पदाधिकारी याच पक्षाचे होणार हे निश्चित आहे. सभापतीपदासाठी सुनिता राऊत आणि सिंधू राठोड यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सुनिता राऊत या लोही या सर्वसाधारण गणातून निवडून आल्या आहे. लोहीच्या सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. याचबरोबर तालुक्यात त्यांचे बचत गटाचे मोठे काम आहे. शिवाय त्यांना पहिल्या टर्ममध्ये संधी न मिळाल्याने यावेळी शब्द दिल्याचा दावा केला जात आहे. तळेगाव गणाच्या सदस्या सिंधू राठोड यांनी तळेगावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांना राजकीय क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या इतरही जमेच्या बाजू असल्याने त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
इतर सदस्यांमधील उषाताई चव्हाण विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. शारदा दुधे आणि सविता जाधव याही सभापतीपदाच्या स्पर्धेत आहे. तथापि सुनिता राऊत आणि सिंधू राठोड यांची नावे जास्त चर्चेत आहे. उपसभापती पदाकरिता साहेबराव कराळे, नामदेव जाधव, पंडित राठोड यांचा पर्याय आहे. यातील पंडित राठोड हे विद्यमान उपसभापती असल्यामुळे दोन पुरुष सदस्यांपैकी कुणाची वर्णी लागते की या पदावरसुद्धा महिला सदस्यांना संधी देऊन पंचायत समितीवर महिलाराज आणले जाते, याचा फैसला लवकरच होणार आहे. या दोन्ही पदांकरिता अंतिम निर्णय आमदार संजय राठोड यांच्या हातात आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारतो, याविषयी उत्सुकता आहे.
सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर
सभापती आणि उपसभापती पदांकरिता नावे निश्चित करताना अनेक बाबींचा विचार केला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातून जिल्हा परिषदेत पद मिळेल का आणि कोणत्या गटाला मिळेल यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबर जातीय समीकरण आणि गटाचा बॅलन्स कसा साधल जाईल, हे पाहूनच निर्णय घेतला जाईल. ही टर्म संपल्यानंतर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उरलेल्या अडीच वर्षात जे सदस्य पंचायत समितीचे प्रशासन व्यवस्थित सांभाळून जनतेला न्याय देऊ शकेल. त्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.