घरकूल योजनेच्या यादीतून गरिबांचीच नावे गायब

By Admin | Updated: September 30, 2016 02:55 IST2016-09-30T02:55:26+5:302016-09-30T02:55:26+5:30

गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे, त्यांना कायमचा आसरा मिळावा यासाठी पंतप्रधान घरकूल योजना राबविली जाते.

The names of the poor disappear from the list of homeless scheme | घरकूल योजनेच्या यादीतून गरिबांचीच नावे गायब

घरकूल योजनेच्या यादीतून गरिबांचीच नावे गायब

धनदांडग्यांची नावे : ७४ वर्षीय वृद्ध १४ वर्षांपासून प्रतीक्षेत
पुसद : गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे, त्यांना कायमचा आसरा मिळावा यासाठी पंतप्रधान घरकूल योजना राबविली जाते. मात्र पुसद तालुक्यातील अनेक गावांत घरकूल योजनेतून गरीबांची नावे गायब असून धनदांडग्यांचा समावेश दिसत आहे. एक ७४ वर्षीय वृद्ध तर गत १४ वर्षापासून गरकूलाच्या प्रतीक्षेत आहे.
माळपठार भागातील आडगाव येथे पंतप्रधान घरकूल आवास योजनेसाठी २०११ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक मागास निराधार, भूमिहीन मजूर असतील त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार होता. परंतु या सर्वेक्षणामध्ये गरजू नागरिकांना वगळून धनाढ्याचा समावेश करण्यात आला होता. आडगाव गावासाठी ७० लाभार्थ्यांची यादी यापूर्वी तयार केली होती. या गावातील रोकडे नामक ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीस गत १४ वर्षापासून घरकूल मिळालेच नाही. गाव पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने घरकूल यादीत धनाढ्य नागरिकांचा समावेश पाहून सर्व सामान्य नागरिक आश्चर्यचकीत झाले आहे. यादीतील जवळपास ४० टक्के लाभार्थी हे योजनेसाठी पात्र नसल्याने सिमेंटची पक्की घरे, शेती असणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही जणांनी तर अगोदरच घरकूल योजनेचा लाभही घेतलेला असून ग्रामपंचायत व शासनाच्या या प्रकारामुळे सर्व सामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये घरकूल यादीचे वाचन करून त्याद्वारे लाभार्थी निवडले पाहिजे परंतु आडगाव येथे यादीत गोरगरीब नागरिकांना वंचित ठेवले आहे. अशी परिस्थिती अनेक गावात असल्याची ओरड आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The names of the poor disappear from the list of homeless scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.