एमआयडीसीचा फलक नावापुरता
By Admin | Updated: September 11, 2014 00:00 IST2014-09-11T00:00:59+5:302014-09-11T00:00:59+5:30
तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही.

एमआयडीसीचा फलक नावापुरता
महागाव : तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही. एमआयडीसीचा फलक आता बेरोजगारांना वाकुल्या दाखवित आहे.
महागाव तालुक्याचा समावेश पूर्वी पुसद तालुक्यात होता. त्यावेळी सर्व सूत्रे पुसदवरून हालत होती. वसंतराव नाईकांच्या कार्यकाळात पुसद येथे सूत गिरणी आणि पोफाळी येथे साखर कारखान्याची निर्मिती झाली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी पिंपळगाव येथे सूत गिरणी आणि गुंज येथे साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. मात्र सहकारातील या संस्था डबघाईस आल्या आहे. साखर कारखाना तर बंदच पडला आहे.
महागाव तालुक्याच्या निर्मितीनंतर येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर प्लॉट पाडण्यात आले. मात्र कुणीही उद्योग उभारण्यास पुढे आले नाही.
सध्या या ठिकाणी केवळ गवताचे साम्राज्य आहे. उद्योग येईल, अशी कोणतीही आशा सद्यातरी दिसत नाही. तालुक्यातील अनेक बेरोजगार कामाच्या शोधात मुंबई, पुण्याकडे धाव घेतात. परंतु गावात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. अनेकांनी लघु उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र भारनियमनाने उद्योग अखेरच्या घटका मोजत आहे. महागाव तालुक्यातील सहकारातील उद्योग डबघाईस आले. नवीन उद्योग उभारायला कुणी पुढे येत नाही. त्यामुळे बेरोजगारांची फौज तालुक्यात निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)