नगरपंचायतीत भाजपाची जादू ओसरली

By Admin | Updated: November 3, 2015 02:56 IST2015-11-03T02:56:33+5:302015-11-03T02:56:33+5:30

जिल्ह्यातील सहापैकी झरी, मारेगाव, बाभूळगाव, कळंब या चार नगरपंचायतींमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न

Nagarpanchayat BJP's magic ostentatious | नगरपंचायतीत भाजपाची जादू ओसरली

नगरपंचायतीत भाजपाची जादू ओसरली

झरी, मारेगाव, बाभूळगाव, कळंब त्रिशंकू : राळेगावात भाजपा तर महागावात परिवर्तनचे वर्चस्व
यवतमाळ : जिल्ह्यातील सहापैकी झरी, मारेगाव, बाभूळगाव, कळंब या चार नगरपंचायतींमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राळेगाव नगरपंचायतीमध्ये भाजपाने तर महागावात सर्व पक्षांना धक्का देत परिवर्तन नगरविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. भाजपाच्या तीन आमदारांची या निवडणुकीत कसोटी लागली होती. या निवडणुकीत उमरखेडच्या आमदाराला महागावच्या नागरिकांनी जबर धक्का दिला.
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमधील १०२ जागांसाठी रविवारी १ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी सोमवारी झाली. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाची हवा ओसरली का याची चाचपणी जिल्ह्यात या निवडणुकांच्या माध्यमातून केली जाणार होती. निकालानंतर ही हवा बऱ्यापैकी ओसरत असल्याचे काही ठिकाणच्या निकालावरून दिसून आले.
जिल्ह्यात सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांपैकी सर्वाधिक २९ जागा भाजपाला मिळाल्या. शिवसेनेला १४, काँग्रेस २७, राष्ट्रवादी ९ तर तब्बल २३ जागांवर अपक्ष निवडून आले. महागाव नगरपंचायतीमध्ये सेना-भाजपाला जोरदार धक्का बसला. तेथे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली गेली. मात्र त्यांना तेथे सेनेचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत राजकीय पटलावर देवसरकर झिरो ठरले. अशीच स्थिती भाजपाचे उमरखेडचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांची झाली. त्यांच्या नेतृत्वात भाजपा लढली. मात्र भाजपाचा केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकला. त्याच्या विजयातही पक्षाचे कमी आणि त्याचे वैयक्तिक योगदान अधिक असल्याचे सांगितले जाते. माजी सरपंच रामराव पाटील नरवाडे यांच्या परिवर्तन नगरविकास आघाडीने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळविला. ही आघाडी महागावात सत्ता स्थापन करणार आहे. ते स्वत: मात्र पराभूत झाले. काँग्रेसच्या शैलेश कोपरकर यांनी वार्ड क्र. १६ मधून त्यांना पराभूत केले. परिवर्तन आघाडीतील गरीब उमेदवार मतदारांना भावल्याचे सांगितले जाते. खासदार राजीव सातव व माजी आमदार विजय खडसे यांच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेसला महागावात पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला एक तर जगदीश नरवाडे यांच्या जन आंदोलन संघर्ष समितीला केवळ एक जागा मिळाली. महागावात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. मात्र त्याचा मतदारांवर काही एक परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रचारसभा मात्र येथे काँग्रेसला पाच जागांवर विजय मिळवून गेली. झरी नगरपंचायतीच्या १७ पैकी एका जागेवरील उमेदवार आधीच बिनविरोध झाला होता. झरीत अवघे हजार-अकराशे मतदार होते. एका वार्डात तर केवळ ११ मतदार होते. त्यातही एकाचे निधन झाले. उर्वरित दहा मतदारांपैकी दोघांनी एकाच्या पारड्यात तर अन्य आठ जणांनी अन्य एका उमेदवाराच्या पारड्यात आपले मताचे वजन टाकून त्याला विजयी केले. त्यातील तीन मते ही एकाच घरातील होती.
कळंब, मारेगाव येथे शिवसेनेने, राळेगावात भाजपाने तर बाभूळगावात भाजपा-सेना युतीने सर्वाधिक जागा जिंकून नगरपंचायतीवर भगवा फडकविला असला तरी प्रत्यक्ष त्यांना सत्ता स्थापन करण्यात यश येते का हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. मारेगाव व झरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणीच्या धर्तीवर चमत्कार घडविण्याचे प्रयत्न चालविले होते. मात्र त्यांना यश मिळाले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

गड आला पण सिंह गेला
झरी व महागाव पंचायत समितीमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ या उक्तीचा परिचय आला. महागावात परिवर्तन नगर विकास आघाडीला तब्बल नऊ जागा मिळाल्या. मात्र या आघाडीचे नेते रामराव पाटील नरवाडे पराभूत झाले. अशीच स्थिती झरीत निर्माण झाली. राजू पेंदोर यांनी पाच जागा जिंकल्या. मात्र त्यांना स्वत:ला विजय मिळविता आला नाही.

दोन पत्रकारांच्या सौभाग्यवतींना पसंती
महागाव नगरपंचायत निवडणूक रिंगणात पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा मोठा सहभाग दिसून आला. तब्बल चार पत्रकारांच्या सौभाग्यवती निवडणुकीला सामोरे गेल्या. त्यापैकी दोघींच्या पदरात यश पडले. तर दोघींना पराभवाचा सामना करावा लागला. एक पत्रकार स्वत:ही रिंगणात होते. मात्र तेसुद्धा पराभूत झाले. राळेगाव नगरपंचायत निवडणुकीतसुद्धा एका पत्रकाराने आपले नशीब आजमाविले. मात्र त्यांनाही मतदारांनी नाकारले.

आता लक्ष नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडली असून त्याचे निकालही लागले. परंतु नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सर्वाधिक जागा मिळवूनही हे आरक्षण अनेक पक्षांचे गणित बिघडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणती नगरपंचायत कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते, यावर बरेच काही अवलंबून आहे. जाहीर झालेल्या आरक्षणाचा उमेदवार नसेल तर सर्वाधिक जागा मिळवून सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षांना ऐनवेळी अपक्ष अथवा अन्य पक्षातील संबंधित संवर्गाच्या उमेदवारापुढे हात जोडावे लागण्याची दाट शक्यता आहे. किंवा तशा आरक्षणाचा एकमेव उमेदवार असल्यास त्याचे भाग्य काहीही न करता फडफडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Nagarpanchayat BJP's magic ostentatious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.