बाभूळगाव ग्रामपंचायत होणार नगरपंचायत
By Admin | Updated: April 8, 2015 02:18 IST2015-04-08T02:18:32+5:302015-04-08T02:18:32+5:30
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होणार असल्याच्या हालचालींना शासनस्तरावरून आता चांगलाच वेग आला आहे.

बाभूळगाव ग्रामपंचायत होणार नगरपंचायत
आरिफ अली बाभूळगाव
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होणार असल्याच्या हालचालींना शासनस्तरावरून आता चांगलाच वेग आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूरचे आयुक्त यांचे पत्र बाभूळगाव पंचायत समितीला प्राप्त झाले असून १ एप्रिलपासून मनरेगाच्या अपूर्ण असलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये काहीअंशी नाराजीचा सूर आहे.
शासनाने धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम हाती घेतला असून शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात धडक सिंचन विहिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातील काही विहिरी मनरेगात वर्ग करण्यात आल्या आहे. बाभूळगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होत असल्याने गावात आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र आयुक्तांच्या या पत्रामुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून बाभूळगाव पंचायत समितीने मनरेगाच्या सर्व कामांना स्थगिती देत मस्टर काढणे बंद केले आहे. यामुळे तहसीलदार नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून जेव्हा काम हाती घेतली तेव्हाची ही कामे आता मार्गी लागणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
सध्या उन्हाळा असल्याने व प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांनी धुमधडाक्यात शेतातील विहिरींचे खोदकाम हाती घेतले आहे. सध्या सुरू असलेले विहिरींचे काम आयुक्तांच्या या पत्रामुळे बंद पडले असून नगरपंचायतीचे प्रशासक पदावर आल्यानंतर ही कामे केली जाणार असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूरचे आयुक्त यांनी आपल्या पत्रात बाभूळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेली, मंजूर झालेली किंवा मंंजुरीसाठी शासन दरबारी पडून असलेली मनरेगाची कामे १ एप्रिल २०१५ पासून बंद करण्यात येणार असल्याने या निर्णयावरून दिसून येत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावीत, या कामांवर त्यानंतर महात्मा गांधी नरेगाचा निधी खर्च करण्यात येवू नये तसेच महात्मा गांधी नरेगातून नगरपंचायतीमध्ये नवीन कामे मंजूर करण्यात येवू नये, अपूर्ण कामांबाबतची पुढील कार्यवाही अधिकारी म्हणून तहसीलदार यांचेमार्फत अपेक्षित असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे सध्या सुरू असलेली कामेही बंद पडली असून शेतकरी, शेतमजूर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. या कामावर असलेल्या मजुरांना आता इतरत्र भटकंती करावी लागत आहे.