कुलरच्या शॉकने मायलेकीचा मृत्यू
By Admin | Updated: September 27, 2016 03:10 IST2016-09-27T03:10:14+5:302016-09-27T03:10:14+5:30
कुलरमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा जबर धक्का बसल्याने तीन वर्षीय चिमुकलीसह आईचा मृत्यू

कुलरच्या शॉकने मायलेकीचा मृत्यू
राळेगाव : कुलरमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा जबर धक्का बसल्याने तीन वर्षीय चिमुकलीसह आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सोनाली दिनेश वानखेडे (२४) आणि पंकोडी दिनेश वानखेडे (३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. शेजारीच राहात असलेली पुतणी सानिका वानखेडे ही सूत मागण्यासाठी दिनेश वानखेडे यांच्या घरी आली. त्यावेळी तिला सोनाली आणि पंकोडी या दोघी निपचित पडलेल्या आढळल्या. तिने या प्रकाराची माहिती तत्काळ आपल्या कुटुंबाला दिली. परिसरातील नागरिक एकत्र आल्यानंतर नेमका काय प्रकार घडला हे लक्षात आले. मेन स्विच सुरू असल्याने कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाने या दोघींचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सोनालीचे पती शेतकामासाठी सकाळीच घरून गेले होते. सोनाली आणि पंकोडी या दोघीच घरी होत्या. नागरिकांनी कुलरची बटन बंद करून दोघींचेही मृतदेह राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. सोनालीची आई मंदाबाई मारोतराव बावने (४०) यासुद्धा शेतकामास गेल्या होत्या. सोनाली ही गर्भवती असल्याचे सांगितले जाते. सदर घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)