मुस्लीम मुलांचे मराठी शिक्षण वाऱ्यावर
By Admin | Updated: December 22, 2016 00:09 IST2016-12-22T00:09:52+5:302016-12-22T00:09:52+5:30
मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ सुरू करण्यात आले आहे.

मुस्लीम मुलांचे मराठी शिक्षण वाऱ्यावर
शिक्षकांना नाही मानधन : विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याकडे दुर्लक्ष
यवतमाळ : मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ सुरू करण्यात आले आहे. मात्र, यासाठी कार्यरत मानसेवी शिक्षकांना तब्बल पाच महिन्यापासून मानधनच देण्यात आले नाही. तर दुसरीकडे शासनाचे निर्देश असूनही विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षाही घेतली नाही.
उर्दू माध्यमातून संपूर्ण शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना पुढे स्पर्धा परीक्षा देताना मराठी विषय अवघड ठरतो. त्यामुळे उर्दू शाळांमध्ये मराठीचे अध्यापन करण्याची मागणी काही संघटनांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. परंतु, पुरेसा प्रचार न झाल्याने जिल्ह्यातील सर्वच उर्दू शाळांचा यात सहभाग नाही. केवळ ३० शाळांमध्ये हा वर्ग चालविला जात आहे. आठवी, नववी आणि दहावीतील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी ३४ मानसेवी शिक्षकांची नेमणूक जुलैमध्ये करण्यात आली. मात्र त्यांचे मासिक ५ हजार रुपयांचे मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. गेल्या शैक्षणिक सत्रापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेली ही योजना चालू सत्रापासून निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविली जात आहे. शिवाय, मानसेवी शिक्षकांचे मानधन पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित होते. ते आता थेट प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या संचालकांच्या (पुणे) अखत्यारित आहे. मराठी फाऊंडेशन वर्गातील विद्यार्थ्यांची दर तिमाहीत चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु, जिल्ह्यात ५ महिने उलटूनही ही परीक्षाच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत कुठलीही आकडेवारी निरंतर शिक्षणाधिकारी स्तरावर उपलब्ध नाही. (स्थानिक प्रतिनिधी)