नगरपरिषदेने अत्यावश्यक कामे करावी
By Admin | Updated: August 10, 2014 23:13 IST2014-08-10T23:13:08+5:302014-08-10T23:13:08+5:30
नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी शासन नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देते. या विधीचा विनियोग करताना अत्यावश्यक सुविधांना

नगरपरिषदेने अत्यावश्यक कामे करावी
यवतमाळ : नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी शासन नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देते. या विधीचा विनियोग करताना अत्यावश्यक सुविधांना नगरपरिषदांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या कामकाजाचा आढावा व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सर्व नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्र्यांसह अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, आ. वामनराव कासावार, आ. संजय राठोड, आ. ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीच्या चंद्ररेखा रामटेके, आर्णीचे आरीज बेग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनेतून नगरपरिषदांना कामे मंजूर होतात. मंजूर कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच निधी वितरीत करण्याच्या सूचना मोघे यांनी बैठकीत केल्या.
नगरपरिषदांकडून विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधीची मागणी असते. त्यातुलनेत कमी निधी असल्याने समान तत्वावर निधी वाटपाचे धोरण स्विकारण्यात येते आहे. शासनास जादा निधी मागविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच विकास कामांसाठी नगरपरिषदेला जास्तीत
जास्त निधी कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोघे म्हणाले.
यावेळी उपस्थित नगराध्यक्षांनी नगरपरिषदांमध्ये असलेल्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. सदर पदे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरल्या जात असल्याने पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षांनी केली. त्यावर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे यांनी नगरपरिषदांच्या
समस्यांवर प्रकाश टाकला. (स्थानिक प्रतिनिधी)