नगरपरिषद हद्दवाढीची गावपुढाऱ्यांत धडकी

By Admin | Updated: April 29, 2015 02:30 IST2015-04-29T02:30:21+5:302015-04-29T02:30:21+5:30

नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर झाली असून, त्यावर आक्षेपही मागविण्यात आले आहेत.

Municipal Council of Great Depression | नगरपरिषद हद्दवाढीची गावपुढाऱ्यांत धडकी

नगरपरिषद हद्दवाढीची गावपुढाऱ्यांत धडकी

यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर झाली असून, त्यावर आक्षेपही मागविण्यात आले आहेत. तब्बल ११ ग्रामपंचायतींचे विलिनीकरण होणार असल्याने गावपुढऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. अनेकांनी तर नगरपरिषद कार्यालयात येरझाऱ्या घालायला सुरूवात केली असून, संभाव्य वार्ड रचना कशी राहिल अशी विचारणाही होत आहे.
नगरपरिषदेच्या हद्दवाढीमुळे ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होत असलेल्या राजकीय घडामोडीत पूर्णत: थांबून नव्याने नगरपरिषद लढावी लागणार आहे. ग्रामपंचायतींच्या वार्डापेक्षा नगरपरिषदेचा वार्ड हा तुलनेने मोठा असतो. शिवाय ६५ ते ७० सदस्य संख्या असलेल्या नगरपरिषदेमध्ये आपला टिकाव लागणार की नाही अशी धडकी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांमध्ये भरली आहे. त्यामुळेच २५ एप्रिलपर्यंत ग्रामीण भागातील २६ जणांनी नगरपरिषदेच्या हद्दवाढीवर आक्षेप दाखल केले आहे. या आक्षेपावर अजूनही सुनावणी झालेली नाही. सर्व आक्षेप नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हद्दवाढ झालेल्या भागात सहा महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत हद्दवाढ होण्या अगोदरच काही ग्रामपंचायत सदस्यांनी वार्डाच्या रचनेचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे.
नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागाची वार्ड फेररचना करूनच येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ही रचना कशी राहिल याचा अंदाज घेण्यासाठी नगरपरिषदेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयात येरझाऱ्या घालणे सुरू केले आहे. मर्यादित क्षेत्रात काम करून असलेल्या ग्रामपंचायतीतील पुढाऱ्यांना आता विस्तीर्ण अशा नगरपरिषदेत लढावे लागणार असल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. काही झाले तरी नगरपरिषद हद्दवाढ थांबली पाहिजे असा खटाटोपही अनेकांकडून सुरू आहे. त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर बाजू आहेत याचा शोध या गावपुढाऱ्यांकडून घेतला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Municipal Council of Great Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.