नगरपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवारी, एबी फॉर्मसाठी शेवटपर्यंत धडपड
By Admin | Updated: October 30, 2016 00:08 IST2016-10-30T00:08:07+5:302016-10-30T00:08:07+5:30
काँग्रेस आणि भाजपाने अनेक विद्यमान नगरसेवकांना डच्चू देत त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला.

नगरपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवारी, एबी फॉर्मसाठी शेवटपर्यंत धडपड
यवतमाळ : काँग्रेस आणि भाजपाने अनेक विद्यमान नगरसेवकांना डच्चू देत त्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. मात्र अनेकांनी पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने या दोन्ही पक्षांसमोर बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
नगरसेवक पदाचा उमेदवार निवडताना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याचा सल्ला दिला. काँग्रेसने पक्षातील काही ज्येष्ठ सदस्यांना डावलून नवख्याना संधी दिली. हाच निकष भाजपनेही लावला. भाजपाने काही प्रभागात पक्षातील दावेदारांना डावलून ऐनवेळी पक्ष प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी बहाल केली. दुसरीकडे शुक्रवारी रात्री पासून पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने भ्रमनिरास झाला. त्यामुळे शेवटच्या क्षणी अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस आणि भाजपने परंपरागत चेहऱ्यांना संधी डावलून नवख्यांना संधी दिली. उमेदवारी देताना जुन्या-नव्यांची सरमिसळ करण्यात आली. यामुळे पक्षाची उमेदवारी निश्चित मानणाऱ्यांना ऐनवेळी मोठा धक्का बसला. पक्ष उमेदवारी देणार नाही, हे कळताच काहींनी सोयीच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचा लाभ काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. भाजपनेसुध्दा काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. इतकेच नव्हे तर पक्षातील दावेदारांना वेटींगवर ठेवून ऐनवेळी आयात केलेल्यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे सध्या काँग्रेस आणि भाजपाच्या गोटात ‘कही खुशी, कही गम‘, अशी स्थिती आहे. अनेक प्रभागात आपल्यासोबत सोयीचा उमेदवार मिळावा म्हणून नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांत हातापाईचे प्रसंगसुध्दा उद्भवले. मात्र नेत्यांनी दोघांतही समेट घडवून प्रकरण जागीच निस्तारले. (कार्यालय प्रतिनिधी)