नगरपरिषदेचा झाला आखाडा

By Admin | Updated: March 30, 2016 02:43 IST2016-03-30T02:43:41+5:302016-03-30T02:43:41+5:30

येथील नगरपरिषदेचा अक्षरश: आखाडा झाला आहे. आत्तापर्यंत पत्रकयुद्धात गुंतलेल्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी आता..

Municipal Council of the Akhaada | नगरपरिषदेचा झाला आखाडा

नगरपरिषदेचा झाला आखाडा

अध्यक्ष-सीओंचे भांडण : शहराच्या विकासाला बसणार खीळ
वणी : येथील नगरपरिषदेचा अक्षरश: आखाडा झाला आहे. आत्तापर्यंत पत्रकयुद्धात गुंतलेल्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी आता एकमेकांविरूद्ध थेट पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. नगरपरिषदेतील दोनही मुख्य चाकेच भांडणात गुंतल्याने शहर विकासाला मात्र खिळ बसत आहे.
नगरपरिषदेत सोमवारी विशेष सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर भलतेच नाट्य घडले. यावेळी नगराध्यक्षांच्या कक्षात प्रभाग क्रमांक चारमधील नागरिक पाण्याची समस्या घेऊन आले होते. त्यांची समस्या जागीच राहिली. ती सुटलीच नाही. मात्र त्यांच्या समस्येवरून नगरपरिषदेत चक्क आखाडा रंगला. या आखाड्यात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उतरले होते.
नागरिकांच्या समस्येसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलाविले असता, त्यांनी उत्तर न देताच तेथून काढता पाय घेतल्याचा आरोप नगराक्षध्यांनी केला. लगेच त्यांच्या मागे आपण गेलो असता, त्यांनी अरेरावी करून आम्ही तुमचे नोकर नाही म्हणत छातीला हात लावून ठोसा मारून चक्क साडी ओढल्याचा आरोपही त्यांनी केला. आपले पती मधात आले असता त्यांनाही तुम्हाला पाहून घेतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत नगराध्यक्षांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर मुख्याधिकाऱ्यांनीही पोलीस ठाणे गाठले. नगराध्यक्षांनी त्यांच्या कक्षात नागरिकांसमोर आपला अपमान करून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे तर तेथे उपस्थित दोन नगरसेवकांनीही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्षांच्या कक्षातून आपल्या कक्षात जाताना नगराध्यक्षांचे पती व त्या दोन नगरसेवकांनी धक्काबुक्की करून गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कलगीतुऱ्यात शहर विकासाचा मात्र खेळखंडोबा होत आहे. त्याचे कुणालाच सोयरसुतक नाही. केवळ अहंभाव जपण्यातच दोघांचीही शक्ती खर्च होत आहे. ‘मी मोठा, की तू मोठा’, या उक्तीप्रमाणे त्यांचे वर्तन सुरू आहे. वास्तविक नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी ही नगरपरिषदेची दोन मुख्य चाके आहे. मात्र ही दोनही चाकेच परस्पर दिशेने फिरत असल्याने नगरपरिषदेचा आखाडा झाल्यासारखे दिसत आहे. केवळ भांडणात वेळ वाया जात आहे.
नगरपरिषदेत अनेक सदस्य अनुभवी आहेत. काही सदस्य तर तीन, चारदा निवडून आलेले आहेत. मात्र त्यांच्या अनुभवाचाही कोणताच लाभ होताना दिसत नाही. पदाधिकारी, अधिकारी, सदस्यांच्या भांडणात प्रशासन मात्र खिळखिळे होत आहे. कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा असताना निधी खर्च करण्याची घाई कुणालाच दिसत नाही. केवळ कोण मोठा, यावरूनच वाद धुमसत आहे. आता वाद थेट पोलिसांत पोहोचल्याने तो शमण्याची शक्यताही मावळली आहे.
पोलिसांनी अद्याप दोघांच्याही तक्रारी चौकशीत ठेवल्या आहे. कुणाविरूद्धही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र दोघांनीही तक्रारीतून एकमेकांविरूद्ध अत्यंत गंभीर आरोप केले आहे. शहराच्या प्रथम नागरिक आणि मुख्य अधिकाऱ्यांमध्येच वाद धुमसल्याने या शहराचे होणार तरी काय, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. मात्र सामान्य नागरिकांच्या भावनेची दखल घेण्यास नगरपरिषदेत सध्या तरी कुणालाच सवड नाही. आता सामान्य नागरिक या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत विकासात अडसर ठरू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्याच्या तयारीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

१३ सदस्यांचे जिल्हाधिकऱ्यांना निवेदन
सोमवारी घडलेल्या घटनेनंतर मंगळवारी १३ नगरसेवकांनी तातडीने यवतमाळ गाठून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ‘सीओं’विरूद्ध राजकीय षड्यंत्रातून तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना येथून स्थलांतरीत करण्यासाठी रचलेला हा कुटील डाव आहे. नगराध्यक्ष आणि काही विशिष्ट व्यक्तींच्या मनमर्जीप्रमाणे सीओ गैरकायदेशीर कामे करीत नसल्याने तसेच भ्रष्टाचाराला संधी देत नसल्याने त्यांच्याविरूद्ध रचलेला हा कट असल्याचा आरोप त्या १३ सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून नगरपरिषदेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Municipal Council of the Akhaada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.