पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद
By Admin | Updated: November 5, 2015 03:02 IST2015-11-05T03:02:25+5:302015-11-05T03:02:25+5:30
स्थानिक नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन नगरसेवकांसह काहींनी त्यांच्या कक्षात जाऊन शिवीगाळ व गोंधळ

पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद
घाटंजी : स्थानिक नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन नगरसेवकांसह काहींनी त्यांच्या कक्षात जाऊन शिवीगाळ व गोंधळ घातला. या प्रकाराच्या निषेधार्थ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन नगरसेवक तीन-चार लोकांसह मुख्याधिकारी धनश्री शिंदे यांच्या कक्षात गेले. एका अतिक्रमणावरून त्यांच्याशी वाद घालत अतिक्रमण आत्ताच काढा, असा आग्रह धरला. एवढेच नाही तर त्यांच्या टेबलवर बुक्क्या मारत गोंधळ घातला. हा प्रकार लक्षात येताच नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके या आपल्या कक्षातून मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात गेल्या. त्यांनी सुरू असलेला गोंधळ थांबविला. झालेल्या घटनेमुळे मुख्याधिकारी घाबरून गेल्या होत्या. त्यांनी तडक यवतमाळ गाठून वरिष्ठांकडे तक्रार नोंदविली. रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास ठाणेदारांनी सुरू केला आहे.
घाटंजी नगरपालिकेचा बेताल कारभार सुरू आहे. कुणाचाही पायपोस कुणालाही नाही. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. अशाच प्रकारातून मुख्याधिकाऱ्यांशी वादाचा प्रकार घडला. यामधून मात्र शहराच्या विकासाला खीळ बसला आहे. यापासून धडा घेण्याची गरज शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)