Mudana-Gaul road invites accident | मुडाणा-गौळ रस्ता देतो अपघाताला निमंत्रण
मुडाणा-गौळ रस्ता देतो अपघाताला निमंत्रण

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पुसद, महागाव, उमरखेडला जाणे-येणे झाले कठीण

नरेंद्र नप्ते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा ते गौळ दरम्यानचा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातची शक्यता बळावली आहे.
मुडाणा ते गौळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावर मुडाणा, गौळ, बोथा, लोहरा, मोरथ, धारमोहा, धारेगाव, उटी, सनेंद, हिंगणी, नेहरुनगर, टेंबुरधरा आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधील विद्यार्थी याच मार्गाने शाळेत जातात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सेनंद हे या मार्गावरील महागाव तालुक्यातील शेवटचे गाव आहे. हाच मार्ग महागाव ते उमरखेड रस्त्याला मुडाणा येथून जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सतत अपघाताची भीती असते. कधी काय होईल, याचा नेम नसतो. पावसाळ्यात या रस्त्यावर दीड फूट खोल जीवघेणे खड्डे पडले. रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहे. त्यामुळे चालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.

रुग्णांचा जीव संकटात
या मार्गावरील कोणत्याही गावातील रुग्णला पुसद येथे नेताना अडचण निर्माण होते. रस्त्याअभावी रात्री-अपरात्री दवाखान्यात जाण्याची वेळ आल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती असते. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता ‘जैसे थे’ आहे.

निधी नसल्याने काम थांबले आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच कामाला सुरुवात होईल.
- संतोष नाईक
उपविभागीय अभियंता, महागाव
 

Web Title: Mudana-Gaul road invites accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.