महावितरणच्या कारभाराने वीज ग्राहकांना मनस्ताप
By Admin | Updated: October 24, 2016 01:12 IST2016-10-24T01:12:53+5:302016-10-24T01:12:53+5:30
मारेगाव वीज वितरण कंपनी कार्यालयातून अनेक विद्युत ग्राहकांना चुकीची देयके येतात.

महावितरणच्या कारभाराने वीज ग्राहकांना मनस्ताप
मारेगाव : मारेगाव वीज वितरण कंपनी कार्यालयातून अनेक विद्युत ग्राहकांना चुकीची देयके येतात. मीटरचे फोटो रिडींग घेऊनसुद्धा मीटरवरील रिडींग मागे अन् देयके धावती पुढे, अशी अवस्था बघायला मिळत आहे. ग्राहकांच्या नावात असंख्य चुका, ही बाब नित्याचीच झाली असताना देयकांवर वीज ग्राहकांचा चक्क पत्ताच बदलविला गेल्याने संबंधितांना देयकच मिळत नसल्याचा प्रकारसुद्धा मार्डी येथील एका वयोवृद्ध वीज ग्राहकांना देयकाबाबतीत घडला आहे.
रशिद खॉ भुमेर खॉ पठाण रा.मार्डी यांचे मार्डी गावातच घर आहे. त्यांनी त्यांच्या घरी २००८ मध्ये वीज पुरवठा घेतला असून त्यांचा पूर्वीचा मीटर क्रमांक डी.एल.४२० असा आहे. बिलींग युनीटने आता नव्याने त्यांना ३७०९९०००११८१ असा ग्राहक क्रमांक दिला आहे.
दर महिन्याला त्यांच्या मीटरचे रिडींगसुद्धा घेतले जाते. ते नियमीत बील भरतात. पण गेल्या एक वर्षांपासून त्यांना बिले मिळत नसल्याने ते कार्यालयात जावून बिले काढून बिलाचा भरणासुद्धा करतात. बिले का मिळत नाही, याबाबत चौकशी केली असता त्यांचे वीज देयकावरील त्यांचे नाव, ग्राहक क्रमांक सर्व बरोबर असताना गावात बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांच्या देयकावर मार्डी गाव न दर्शविता धामणी, धमाणी/वानी- ४४५३०४ असे नाव असल्याने त्यांच्या नावांची बिले वितरणासाठी धामणी गावात जात असावे व तेथूनच ते वाटप करणाऱ्यांच्या हस्ते कचऱ्यात जात असावे. म्हणून त्यांना बिले मिळत नव्हती.
वीज देयकावरील चुकीच्या पत्त्यात दुरूस्ती करण्याची मागणी वृद्ध रशिद खॉ यांनी गेल्या एक वर्षापासून मारेगावच्या उपविभागीय अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र अजूनही बिलातील चुक दुरूस्त करून देण्यास चालढकल केली जात आहे. वारंवार कार्यालयात जावून बिले काढणे शक्य नसल्याने बिलातील धामणी नाव कमी करून मार्डी गाव, अशी सुधारणा करूनच देयक द्यावी. अन्यथा आपण बिलच भरणार नाहीत व भविष्यात विद्युत पुरवठा खंडित केल्यास ग्राहक मंचात जावू, असा इशाराही पठाण यांनी संबंधित अभियंत्याला दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)