दिग्रसच्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’चा प्रस्ताव
By Admin | Updated: October 19, 2016 00:15 IST2016-10-19T00:15:27+5:302016-10-19T00:15:27+5:30
समाजातील शांततेला बाधक असल्याचे नमूद करीत दिग्रस येथील एका गुंडाला ‘एमपीडीए’खाली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी पोलीस करीत आहे.

दिग्रसच्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’चा प्रस्ताव
यवतमाळ : समाजातील शांततेला बाधक असल्याचे नमूद करीत दिग्रस येथील एका गुंडाला ‘एमपीडीए’खाली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी पोलीस करीत आहे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
हिस्ट्रीशिटर व क्रियाशील गुन्हेगारांवर अधिकाधिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या गुंडांच्या प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे मुसक्या आवळल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए या सारखी गंभीर कारवाई केली जात आहे. खंडाळा, वडकी येथील प्रकरणात अलिकडेच मोक्का लागला होता. आता दिग्रस येथील शरीरासंबंधीचे गुन्हे दाखल असलेल्या एका गुंडाविरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अॅक्टीव्हीटीज-झोपडपट्टीदादा) लावला जात आहे. यासंबंधीचा प्रस्ताव दिग्रस पोलीस ठाण्यात तयार झाला आहे. लवकरच तो स्थानिक गुन्हे शाखेमार्फत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य काही ठाण्यांच्या हद्दीतील क्रियाशील गुंड पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जाते. दिग्रसच्या गुंडाला ‘एमपीडीए’अंतर्गत किमान वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाऊ शकते.