दिंदोडा प्रकल्पग्रस्त नदीपात्रात आंदोलन करणार
By Admin | Updated: May 14, 2017 01:23 IST2017-05-14T01:23:49+5:302017-05-14T01:23:49+5:30
जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विाकस महामंडळामार्फत प्रस्तावित दिंदोडा प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज

दिंदोडा प्रकल्पग्रस्त नदीपात्रात आंदोलन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विाकस महामंडळामार्फत प्रस्तावित दिंदोडा प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज प्रकल्प संघर्ष समितीच्यावतीने काही मागण्यांसाठी नियोजित बॅरेज प्रकल्पस्थळी नदीपात्रात २० मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर सहकुटुंब या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
तालुक्यातील सावंगी (संगम) येथे प्रस्तावित दिंदोडा बॅरेज महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जलसंधारण विभाग चंद्रपूर व विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळाने १९९७-९८ मध्ये यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वेणा नदी किनाऱ्यालगतच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवित सन १९९९-२००० मध्ये अधिग्रहीत जमिनींचा अल्पसा मोबदलासुद्धा दिला. नंतर प्रकल्प निर्मितीचा मूळ उद्देशही बदलविला गेला. पण प्रकल्पाच्या कामाला गेल्या २० वर्षांपासून अद्याप प्रारंभ झाला नाही. परिणामी सन १९९९ ते २००० मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या, परंतु शासनाने आजपर्यंत त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा ताबा घेतला नाही. त्या जमिनीवर आताही मूळ मालकाचाच ताबा व वहिती असून काहींना अद्याप जमिनीचा मोबदलासुद्धा देण्यात आला नाही. त्यामुळे नवीन भूमीअधिग्रहण कायदा २०१३-१४ कलम २४(२) नुसार ते अधिग्रहण रद्द करण्यात यावे, मागील १८ वर्षांपासून शासनाने संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा रेकॉर्डवर संपादीत जमिनीबाबतची नोंद व २०१६ साली घेतलेला फेरफार रद्द करण्यात यावा, प्रकल्पासाठी संपादीत केली जाणारी जमीन अत्यंत सुपीक असल्याने ती संपादीत करूच नये, अशा संघर्ष समितीच्या मागण्या आहेत. जनसुनावणीत शेतकऱ्यांनी प्रकल्पाला प्रखर विरोध केला. शासनाने या प्रश्नांकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे आता नदीच्या पात्रातच ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अभिजीत मांडेकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.