इंदिरा सूत गिरणी सुरू होण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:49 IST2019-06-03T21:49:18+5:302019-06-03T21:49:30+5:30
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या इंदिरा सहकारी सुतगिरणीचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून रेंगाळत आहे. मात्र आता स्थानिक आमदार व सुतगिरणी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही सुतगिरणी सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखविल्याने आता सुतगिरणीची चाके फिरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

इंदिरा सूत गिरणी सुरू होण्याच्या हालचाली
म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या इंदिरा सहकारी सुतगिरणीचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून रेंगाळत आहे. मात्र आता स्थानिक आमदार व सुतगिरणी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही सुतगिरणी सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखविल्याने आता सुतगिरणीची चाके फिरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
वणी-मारेगाव-झरी तालुक्यांमध्ये लांब धाग्याचा कापूस पिकतो. त्याला जागतिक बाजारामध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील जिनिंगला ‘अच्छे दिन’ आले. त्यांनी आपला चांगभलं करून घेतलं आहे. मात्र गेल्या ३० वर्षांपासून शेतकरी गिरणीची प्रतीक्षा करीत आहे. आतापर्यंत या सुतगिरणीच्या नावावर केवळ राजकारण करण्यात आले. सुतगिरणीमध्ये १६ संचालक असून ४२ एकर जागेवर ही गिरणी उभी आहे. शेतकऱ्यांचे भांडवल व सरकारी मदतीने सुतगिरणीची भव्य ईमारत उभी आहे. ही सुतगिरणी सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीत सुतगिरणीबाबत विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली. यावेळी एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले. सुतगिरणीचा प्रकल्प खर्च अहवाल ६,०५२ लाखांचा असून त्यांपैकी पाच टक्के तीन कोटी ३ लाख सभासदांचे भागभांडवल व ४५ टक्के शासकीय भाग भांडवल असे २,७२४ लाख आणि उर्वरित ५० टक्के ३०२६ लाख रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज उभारून प्रकल्प कार्यान्वीत करावयाचा आहे. यांपैकी आतापर्यंत २३३ लाख सभासद भागभांडवल व ११९३.२५ लाख शासकीय भांडवल प्राप्त झाले आहे. उर्वरित ७० लाख सभासद भागभांडवल गोळा झाल्यानंतर पूर्णत: १५३१ लाख रूपये शासकीय भागभांडवल गिरणीस उपलब्ध होणार आहेत. त्यांपैकी ९५० लाख शासनस्तरावरून शासकीय भागभांडवल मंजूर झाले असून लवकरच सुतगिरणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तसेच शासनाकडून भागभांडवल प्राप्त झाल्यास बँक कर्ज मंजुरीचे प्रयत्न करण्यात यावे, अशी सूचना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली.
यावर सर्व सभासदांनी सहमती दर्शविली आहे. अर्थसहाय्य प्राप्त होताच वर्षभरात सुतगिरणी कार्यान्वीत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. उत्पादन सुरू झाल्यास ७०० बेरोजगारांचा प्रश्न ३०० अप्रशिक्षीतांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. हा प्रकल्प एका वर्षात सुरू होईल, असे सुतगिरणीचे व्यवस्थापक अरूण विघळे यांनी सांगितले.
ही सुतगिरणी सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. जिनिंगचा अनुभव, भागभांडवलची समस्या होती. भाजपा व शिवसेनेची सत्ता आल्याने या क्षेत्रातील अधिकारी, सहकार क्षेत्रातील अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच आ.बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन समस्या सांगितली. त्यामुळे कामाला वेग आला आहे.
- सुनील कातकडे,
अध्यक्ष सुतगिरणी
या परिसरात बेरोजगारीचा प्रश्न असून सुतगिरणीमध्ये अनेकांनी राजकारण करून हा प्रश्न रेंगाळत ठेवला. मागील काळात कंत्राटदाराने कामदेखील केले नाही. पण ही सुतगिरणी सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून याकरिता मी मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावून हा प्रश्न मांडला आहे. त्यात नक्कीच यश येईल.
- संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार, वणी विधानसभा क्षेत्र