दारूबंदीसाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार
By Admin | Updated: July 23, 2015 02:21 IST2015-07-23T02:21:43+5:302015-07-23T02:21:43+5:30
जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात आंदोलने झाली आहेत.

दारूबंदीसाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार
‘स्वामिनी’चा पवित्रा : मुख्यमंत्र्यांना पाठविणार फाटकी साडी
यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात आंदोलने झाली आहेत. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतरही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत साधा प्रश्नही विचारला नाही. ही बाब खेदजनक आहे. या विरोधात स्वामिनी आमदारांना जाब विचारणार आहे. त्यासाठी आमदारांच्या घरासमोर मुक्काम ठोकणार आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांना फाटकी साडी पाठविणार असल्याची माहिती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राज्य घटनेमध्ये अनुच्छेद ४६ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. एखाद्या बाबीला नागरिकांनी विरोध केल्यास त्याला चांगला प्रतिसाद असल्यास सरकारला आपली भूमिका जाहीर करावी लागते. याठिकाणी मूळ उद्देशालाच मूठमाती घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली आहे. महसूल मंत्र्यांनीही याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. लोकप्रतिनिधी तर अवाक्षरही काढायला तयार नाही. त्यांना जिल्ह्यात दारूबंदी व्हावी असे मूळातच वाटत नाही. आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने यांनी स्वामिनीच्या कार्यकर्त्यांना लेखी पत्र दिले आहे. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडू, असा उल्लेख त्यात आहे. मात्र अधिवेशनात जाब विचारलाच गेला नाही. ही बाब दुर्देवी आहे. आम्ही आंदोलन थांबविणार नाही. हे आंदोलन अधिक तीव्र होईल. लोकप्रतिनिधींकडेच आंदोलक मुक्काम ठोकणार असल्याची माहिती दिली. दारू पिणाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांची काय दशा सुरू आहे हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना स्वामिनीच्या कार्यकर्त्या फाटक्या साड्यांचा आहेर पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला स्वामिनीचे संयोजक महेश पवार, प्रा.घनश्याम दरणे, नितीन कापसे, प्रज्ञा चौधरी, प्रतिभा अजमिरे, अरुणा बावणे, रिना घावडे, मनीषा काटे, रेणूका अजमिरे, पांडुरंग बावणे, रेणूका माजरे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी स्वामिनीने मुंबईतील आझाद मैदानात धरणे दिले. जिल्ह्यातील हजारो महिला यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, शिष्टमंडळाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन दिले. त्याचवेळी दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या संगीता पवार आणि उमेश मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आपल्या सोबतच्याच असल्याचे सांगितले. हा प्रकार आंदोलनाचे श्रेय लाटण्याचा असल्याचा आरोप स्वामिनीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आमचा विरोध आंदोलनाला नसून श्रेय लाटण्याला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.