पुनर्वसनात समस्यांचा डोंगर

By Admin | Updated: August 27, 2015 00:13 IST2015-08-27T00:13:04+5:302015-08-27T00:13:04+5:30

बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत.

The mountain of problems in rehabilitation | पुनर्वसनात समस्यांचा डोंगर

पुनर्वसनात समस्यांचा डोंगर

विकासापासून दूर : बेंबळा प्रकल्पग्रस्तांना हव्या स्वतंत्र ग्रामपंचायती
घारफळ : बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत. या गावांचा कारभार पंचायत समिती अधिकारी सांभाळत असल्याने सुविधांची बोंबाबोंब आहे. समस्यांचा डोंगर या गावांमध्ये उभा झाला आहे. आता नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जाची प्रतीक्षा आहे.
बेंबळा प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक गावांचे पुनर्वसन झाले. कोल्ही क्र.१, कोल्ही क्र.२, दिघी-१, दिघी-२, कोठा, फत्तेपूर, थाळेगाव, भटमार्ग आणि मिटणापूर या गावांचा यामध्ये समावेश आहे. ज्या गावांनी शेतजमिनी, घरे-दारे प्रकल्पासाठी दिली तेच विकासापासून दूर आहेत.
कोल्ही क्र.२ या पुनर्वसित गावात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधितांना निवेदने दिली. त्याला केराची टोपली मिळाली. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देऊनही एकही समस्या निकाली निघालेली नाही. विकास कामे ठप्प आहेत. कोल्ही क्र.२ येथेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. महिन्यातून केवळ सहा दिवस योजनेचे पाणी उपलब्ध होते. इतर दिवशी अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सरूळ येथे खर्डा धरणाच्या बुडीत क्षेत्रात बांधण्यात आली. तेथूनच गावात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली. ती निकृष्ट असल्याने जागोजागी फुटली. यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावातील स्मशानभूमीत असलेला हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहे.
वीज पुरवठा नेहमी खंडित असतो. गावात बसविण्यात आलेल्या रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यातील विद्युत उपकरणे जळाली. नवीन लावण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. एकही सिमेंट रस्ता नाही, पूल खचलेले आहेत. पांदण रस्ताही नसल्याने नागरिकांना शेतात जाण्याचा प्रश्न आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने सदर गावांचा विकास खोळंबला आहे. पोलीस पाटील, स्वतंत्र अंगणवाडी नाही. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असलेली लोकसंख्या अनेक पुनर्वसित गावांची आहे. मात्र प्रशासनातील दिरंगाईमुळे ही गावे वंचित आहेत. परिणामी विकास खुंटला आहे. (वार्ताहर)
सुविधांपूर्वीच करावे लागले स्थानांतरण
कुठल्याही प्रकल्पासाठी पुनर्वसन करायचे असल्यास त्याठिकाणी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शाळा, वीज, पाणी, रस्ते, नाल्या यासह इतर सुविधा मिळाल्याशिवाय स्थानांतरण केले जात नाही. मात्र बेंबळा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या गावांतील नागरिकांना या सुविधा मिळण्यापूर्वीच हलविण्यात आले. आता या गावातील लोकांना साध्या खडीकरणाच्या रस्त्यासाठीही संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पाणी नसल्याने पावसाळ्यातही काही गावातील लोकांची पायपीट सुरू आहे. नळ योजनेचे तर दूर हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यासाठीही भटकावे लागते. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीची प्रतीक्षा आहे.

Web Title: The mountain of problems in rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.