पालकमंत्र्यांच्या गावातच मोटरपंप चोरट्यांचा उच्छाद
By Admin | Updated: September 4, 2015 02:27 IST2015-09-04T02:27:18+5:302015-09-04T02:27:18+5:30
पालकमंत्री संजय राठोड यांच्या पहूर गाव शिवारातील शेतकरी मोटारपंप चोरट्यामुळे जेरीस आले आहे.

पालकमंत्र्यांच्या गावातच मोटरपंप चोरट्यांचा उच्छाद
वडगाव जंगल ठाणे : चोर दाखवताच तडजोड
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या पहूर गाव शिवारातील शेतकरी मोटारपंप चोरट्यामुळे जेरीस आले आहे. शेतातील हजारो रुपये किंमतीचे मोटरपंप लंपास होत आहेत. या चोरीचा छडा लावण्याऐवजी पोलीसच चोरट्यांची मध्यस्थी करताना दिसत आहे. आरोपींची ओळख पटवून दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही.
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहूर, मेटीखेडा शिवारातील शेतातून अनेक मोटरपंप चोरी गेले आहे. मेटीखेडा येथील राजुद्दीन सैय्यद यांच्या शेतातून १० आॅगस्ट रोजी मोटरपंप चोरीस गेला. त्यांनी वडगाव जंगल ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदविण्यापलिकडे काहीच केले नाही. शेतकऱ्याला चोराचा सुगावा लागला. एक मोटरपंप आॅटोतून नेल्याची माहिती आॅटोचालक सचिन किन्हेकार रा. पहूर याने दिली. त्यावरून शेतकऱ्यानेच आरोपींचा छडा लावला. त्याने आरोपींची नावे वडगाव जंगल पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपी श्याम सुरपाम, सागर परचाके दोघेही रा. मेटीखेडा यांच्याकडून मोटरपंप परत मिळविला. आरोपींनी यवतमाळ येथून राजू सय्यद याला त्याचा पंप दिला. मात्र यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. या चोरट्यांकडून इतरही गुन्ह्याचा छडा लागला असता. पोलिसांचीच मिलीभगत असल्याने मोटरपंप चोरीच्या घटना होत असल्याचा आरोप केला जात आहे. पालकमंत्री राठोड यांच्या गावातील हसमुख राठोड, सिध्दार्थ दावपुरे आणि मेटीखेडा येथील विजय चव्हाण यांचे मोटरपंप चोरीस गेले. याचा आतापर्यंत पोलिसांनी शोध घेतला नाही. यवतमाळातील एक मोठी टोळीच जिल्ह्यात मोटरपंप चोरीचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. वडगाव जंगल पोलिसांनी या आरोपींना अभय दिल्याने संताप व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)