माँ शारदेला साद अन् बासरीलाही दाद!

By Admin | Updated: March 25, 2017 00:14 IST2017-03-25T00:14:47+5:302017-03-25T00:14:47+5:30

तऱ्हे तऱ्हेच्या हिरव्यागार वृक्षराजींचे नैसर्गिक नेपथ्य. पायाखाली थंडगार हिरवळ. हवेची झुळूक अन् पाठोपाठ येणारे बासरीचे अद्भूत सूर.

Mother Saradela Saad and her paternal grandfather! | माँ शारदेला साद अन् बासरीलाही दाद!

माँ शारदेला साद अन् बासरीलाही दाद!

‘स्वरांजली’ रंगली : ज्योत्स्ना दर्डा यांना यवतमाळात सूरमयी श्रद्धांजली
यवतमाळ : तऱ्हे तऱ्हेच्या हिरव्यागार वृक्षराजींचे नैसर्गिक नेपथ्य. पायाखाली थंडगार हिरवळ. हवेची झुळूक अन् पाठोपाठ येणारे बासरीचे अद्भूत सूर. बासरी दाद मिळवत असतानाच शास्त्रीय गायनालाही आरंभ. स्वर-सूरांची ही मैफल गुरुवारी सायंकाळी येथील दर्डा उद्यानात अलौकिक वातावरणनिर्मिती करून गेली. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे!
ज्योत्स्ना दर्डा यांच्या चौथ्या पुण्यस्मरणदिनानिमित्त यवतमाळात ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम पार पडला. ख्यातनाम बासरीवादक एस. आकाश आणि प्रथितयश शास्त्रीय गायिका अंकिता जोशी या कलावंतांनी यवतमाळकर रसिकांसाठी खास रचना सादर केल्या. मैफलीसाठी दर्दी रसिकांनी गर्दी केली होती.
द्रूत आणि विलंबित ख्यालातली बासरी जसजशी वाजत गेली, तसतशी उदास अंत:करणात उमेद फुंकत गेली. एस. आकाश या उमद्या बासरीवादकाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. मारवा, सारंग असे राग आळविणारी बासरी सुरवातीला रसिकांना स्तब्ध करून गेली. नंतर हनुमंत फडकरे यांचा तबला आणि एस. आकाश यांची बासरी अशी जुगलबंदी सुरू झाली, तेव्हा कलाकारांनी यवतमाळकरांच्या हातून टाळ्या वसूल केल्या. प्रत्येक समेवर ‘व्वा’ अशी दाद मिळत होती. ‘ज्ञानियाचा राजा गुरू महाराव’ ही रचना सादर करणाऱ्या एस. आकाश या तरुण कलाकाराला रसिकांनी थेट काळजात जागा दिली.
तब्बल दीड तास बासरीच्या सुरांनी मोहीत झालेल्या रसिकांपुढे नंतर शास्त्रीय गायनाचा नजराणा पेश झाला. अंकिता जोशी यांनी राग बागेश्रीने आरंभ केला. ‘मॉ शारदे विणा सुशोभित शरद इंदू वदनी’ या ओळी आळविता ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली अर्पण केली. ‘ओ तो ता रे ता दा रे दा नी’ ही तान डोलायला लावणारी होती. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील झरीना या पात्रासाठी अंकिताने पार्श्वगायन केले आहे. तीच रचना तिने मैफलीत सादर केली. ‘दिल की तपीश आज है आफताब’ ही बंदिश कट्यारीसारखीच मनाचे तार छेडून गेली. लगोलग ‘केसरिया बालम आवोनी पधारो म्हारे देस’ या राजस्थानी गीतातून अंकिताच्या गोड गळ्याची प्रचिती आली. रसिकांच्या खास फर्माईशीवरून तिने ‘मोहे रंग दो लाल नंद के लाल’ ही रचनाही ताकदीने सादर केली. ‘गोविंदम् गोकुलानंदम्’ हा अभंग वेगळ्या ढंगात सादर झाला. ‘नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबाला पाहू’ गात ‘विठ्ठलम् विठ्ठलम्’ आळवित अंकिताने तन्मयतेने समारोप साधला.
या कार्यक्रमाला लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, माजी मंत्री सुरेशदादा जैन, उद्योगपती रमेशदादा जैन, नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

सूरज्योत्स्ना पुरस्कारप्राप्त कलावंतांना संधी
गुरुवारी यवतमाळात सादर झालेल्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमातील दोन्ही कलावंतांनी यापूर्वी ‘सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ पटकावला आहे. सूत्रसंचालकांनी ही बाब रसिकांना सांगितली, त्याचवेळी विजय दर्डा यांनी घोषणा केली की, २०१७ सालचा सूरज्योत्स्ना पुरस्कार पटकावणारे कलावंत पुढील वर्षी यवतमाळात होणाऱ्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमात येतील.
 

Web Title: Mother Saradela Saad and her paternal grandfather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.