आई व मुलाने केला युवकाचा खून
By Admin | Updated: March 9, 2017 00:07 IST2017-03-09T00:07:35+5:302017-03-09T00:07:35+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आई व मुलाने ३० वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी बदडले. यात त्या युवकाचा मृत्यू झाला.

आई व मुलाने केला युवकाचा खून
नेरची घटना : कुत्रा चावल्याचे झाले निमित्त
नेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आई व मुलाने ३० वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी बदडले. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सोन्या ऊर्फ पंडित धर्मेंद्र पवार, असे मृताचे नाव आहे. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास सोन्या येथील बाजार समिती प्रांगणात आला. तेथे मजुरीचे काम करीत असलेल्या कौसल्याबाई बळीराम इंगळे (४७) यांच्याशी त्याने वाद घातला. तुझा कुत्रा मला चावला, आता दवाखान्यात जाण्यासाठी पैसे दे, असे म्हणत त्याने बाचाबाची सुरू केली. तो जास्तच बरळू लागल्याने कौसल्याबाई यांच्या शेजारीच उभा असलेला त्यांचा मुलगा गौरव ऊर्फ सूरज याचा संयम सुटला. आईला शिव्या देत असलेल्या सोन्या ऊर्फ पंडितला त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
नंतर कौसल्याबाई मुलाच्या मदतीला धावल्या. या दोघांनी सोन्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात सोन्या जागीच बेशुद्ध पडला. त्याला लागलीच बाजार समितीमधील काहींनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा सर्व प्रकार बाजार समितीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी बाजार समितीचे शिपाई सुभाष बापूराव गुजर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कौसल्याबाई व मुलगा गौरव ऊर्फ सूरजविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ठाणेदार संजय पुज्जलवार, पीएसआय अजय भुसारी, हरिश्चंद्र कार पुढील तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)