खंडाळा, जेवली बीटमध्ये सर्वाधिक वृक्षतोड

By Admin | Updated: September 27, 2014 23:24 IST2014-09-27T23:24:02+5:302014-09-27T23:24:02+5:30

पुसद वनविभागांतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून सागवान तोड सुरू असून खंडाळा, घानमुख, जेवली बीटमध्ये सर्वाधिक सागवान तोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणात बहुतांश वेळा

Most trees in Khandala, Jawali Beat | खंडाळा, जेवली बीटमध्ये सर्वाधिक वृक्षतोड

खंडाळा, जेवली बीटमध्ये सर्वाधिक वृक्षतोड

पुसद : पुसद वनविभागांतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून सागवान तोड सुरू असून खंडाळा, घानमुख, जेवली बीटमध्ये सर्वाधिक सागवान तोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणात बहुतांश वेळा कनिष्ठांवरच कारवाई केली जाते. वरिष्ठ अधिकारी मात्र सहीसलामत सुटत असल्याचे दिसून येते.
पुसद वन विभागांतर्गत अलिकडे मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीच्या घटना उघडकीस आल्या. तेलंगणातील तस्करांनी या जंगलामध्ये धुडगूस घातला आहे. या चोरट्यांचे लक्ष्य वारंवार विशिष्ट बीटवरच असल्याचे दिसत आहे. महागाव वन परिक्षेत्रात नांदगाव वनकुटीजवळ १०० ते १५० गोलाई असलेल्या सागवान वृक्षांची कटाई झाली. कंपार्टमेंट क्र.४३६ घानमुख बीटमधील आहे. या शासकीय मालाची किमत २३ हजार ४३१ रुपये दाखविण्यात आली. वास्तविक पाहता ही वृक्षतोड लाखोंच्या घरात आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी येऊ नये व निलंबनाची कारवाई होऊ नये, यासाठी कमी किमत लावण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सप्टेंबर २०१४ च्या सुरुवातीला महागाव वनपरिक्षेत्रातील फुलसावंगी राऊंडमधील दर्यापूर-बोरगाव बीटमधील कंपार्टमेंट ४८३ मध्ये सागवान वृक्षाची अवैध कटाई झाली. ३३ वृक्ष तोडल्याचे पुढे आले. याची शासकीय किमत ९० हजार १२६ रुपये दाखविण्यात आली. वास्तविक बाजारमूल्य चार ते पाच लाखांचे आहे. यातही असाच वरिष्ठांना वाचविण्याचा प्रकार झाला.
खंडाळा राऊंडमधील कंपार्टमेंटमधील ४०० व ४०१ मध्येसुद्धा २० ते २२ वृक्षांची तोड झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचा प्राथमिक रिपोर्ट देणे क्रमप्राप्त होते. परंतु घटनेचे गांभीर्य कमी करण्यासाठी दोन-तीन दिवसआड एक-एक, दोन-दोन वृक्षांचा प्राथमिक गुन्हा रिपोर्ट नोंदविला गेला. याच शासकीय जंगलातील मौल्यवान आडजात वृक्षही तोडण्यात आले. या बीटची योग्य तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. उमरखेड वनपरिक्षेत्रातील जेवली बीटमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी अधिकाऱ्यांसह या ठिकाणी जावून पाहणी केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. परंतु वरिष्ठांनी पाठ फिरविली की कर्मचारी मोकळे होतात, असाच काहीसा अनुभव आहे.
जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तोड होत असताना केवळ थातूरमातूर चौकशी करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायचा आणि वरिष्ठांना पाठीशी घालायचे, असाच काहीसा प्रकार सुरू आहे. पुसद वनविभागात सुरू असलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घबाड बाहेर येवू शकते. परंतु जंगलाबद्दल कुणालाच प्रेम नाही. केवळ नोकरी करायची, असा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Most trees in Khandala, Jawali Beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.