५० पेक्षा अधिक उमेदवार अविरोध
By Admin | Updated: April 10, 2015 00:17 IST2015-04-10T00:17:50+5:302015-04-10T00:17:50+5:30
तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

५० पेक्षा अधिक उमेदवार अविरोध
वणी : तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता ८१३ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहे. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान तालुक्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.
निवडणूक पार पाडण्यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नऊ अधिकाऱ्यांनी बुधवारी नामांकन अर्जांची छाननी केली. छाननीनंतर विविध गावांतील १५ जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्यामुळे या १५ जागा आता रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीच्या सर्वच जागा रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर जवळपास ५० उमेदवार अविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा होणेच बाकी आहे.
यामध्ये सावर्ला २, कवडशी ३, निलजई ३, बेलोरा २, तरोड २, पिंपळगाव २, निवली ३, बेसा ३, चिंचोली ५, शेवाळा १, सावंगी ५, परसोडा २, महाकालपूर ३, नवरगाव ३, पिंपरी १, पेटुर २, विरकुंड ३ अशा प्रकारच्या जागा अविरोध होणार आहे. दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील अविरोध जागांची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. परंतु तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या १२३ प्रभागातील ३१६ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यापैकी ५० पेक्षा अधिक जागा अविरोध होणार आहे. १५ जागा रिक्त राहणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व त्यांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. निवडणूक यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. काही कर्मचाऱ्यांना ऐनवेळी निवडणूक कामासाठी नियुक्ती देण्यात आली. मात्र त्यांच्या पत्रात त्यांना यापूर्वीच आपणाला माहिती देण्यात आल्याचा उल्लेख आहे. (लोकमत चमू)