पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली
By Admin | Updated: June 10, 2017 01:00 IST2017-06-10T01:00:49+5:302017-06-10T01:00:49+5:30
मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली आहे.

पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली
घरांची डागडुजी : प्लास्टिक ताडपत्री, टीनपत्र्यांची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली आहे. घरांच्या डगडुजीसाठी प्लास्टिक ताडपत्री, टीनपत्रे आदी खरेदी सुरू झाली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे छतावर तसेच जनावरांचा चारा खराब होवू नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करतात. मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक येत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्लास्टिक तात्रपत्रीचे भाव आहेत. कोणत्याही प्रकारची फारशी वाढ झाली नाही. ताडपत्री ५०० ते ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, तर प्लास्टिक पन्नी ५० ते ७० रुपये मीटरपर्यंत उपलब्ध आहे. बाजारात प्लास्टिक व नायलॉन प्रकारातील दोर उपलब्ध आहे. नायलॉन प्रकारातील दोराची किमत १५५ रुपये प्रतिकिलो आहे, तर सूती प्रकारातील दोरी १२५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. प्लास्टिक बाजारात सध्या तेजीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले असून छतावरील टीनपत्रे बदलले जात आहे. बाजारात १४० रुपयांपासून विविध आकारातील टीनपत्रे उपलब्ध आहे. पावसाच्या तोंडावर टीनपत्रे खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. शेततळ्यांसाठी लागणाऱ्या प्लास्टिक केबल कापडाही मागणी आहे. साधारणत: १५० ते १७५ रुपये किलोदराने शेततळ्याचे कापड उपलब्ध आहे. ५० ते ९० टक्के प्रतीचे हे कापड ५० रुपयांपासून १२० रुपये मीटरप्रमाणे विक्री होत आहे.
कवेलूची घरे नामशेष
ग्रामीण भागात पूर्वी गवत आणि कवेलूची घरे मोठ्या प्रमाणात असायची. पावसाळ्यापूर्वी या घरांची डागडुजी करून कवेलूची फेरणी केली जात होती. परंतु आता कवेलूची घरे नामशेष झाल्याने ही कामे केली जात नाही.