मान्सूनपूर्व वादळाचा कहर
By Admin | Updated: May 29, 2017 00:22 IST2017-05-29T00:22:10+5:302017-05-29T00:22:10+5:30
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली,

मान्सूनपूर्व वादळाचा कहर
आठ तालुक्यांना फटका : महावितरणला ४३ लाखांचा झटका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील आठ तालुक्यात महावितरणचे तब्बल ४३ लाखांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. वणी, पांढरकवडा, दारव्हा, मारेगाव, झरी, नेर, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ आदी तालुक्याला पाऊस आणि वादळने झोडपून काढले. वणी, पांढरकवडा, नेर आणि दारव्हा तालुक्यातील सर्वाधिक गावांना या वादळाचा तडाखा बसला. नेर तालुक्यातील घुई, लिंगा, बोरगाव, मोझर, सोनखास, उत्तरवाढोणा, लासीना परिसरात १५ मिनीटांच्या वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे व वीज खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले. अनेक घरांचीही पडझड झाली.
दारव्हा तालुक्यात कामठवाडा, चाणी, चिकनीत वादळाने कहर केला. दारव्हा-यवतमाळ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनेक वृक्ष उन्मळून पडले. हा मार्ग तब्बल १० तास बंद असल्याने वाहतूक ठप्प पडली. अनेक वीज खांब तुटून पडल्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. यवतमाळ तालुक्यातील तिवसा, वारज, हिवरी, इचोरीतही मोठे नुकसान झाले. हिवरीत दिलीप जोशी यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. बाभूळगाव, वणी व पांढरकवडा तालुक्यालाही वादळाचा मोठा फटका बसला. आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यांनी दारव्हा तालुक्यातील काही गावांना भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात ३६० खांब कोसळले
वादळाने महावितरणलाही मोठा फटका बसला. कामठवाडा-चाणी येथे ४० खांब कोसळले. राळेगावमधील वडकी, झाडगाव परिसरात १६ खांब तुटले. रूई-वाई आणि हिवरीमध्ये १६ खांब तुटले आहे. वणी तालुक्यात नांदेपेरा परिसरात २५ खांब बाधीत झाल्याने परिसरातील १५ गावांचा वीज पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यात एकूण ३६० खांब कोसळले. उच्च दाब व लघुदाब वाहिनीचे खांब कोसळल्याने महावितरणला ४३ लाखांचा फटका बसला आहे. या वादळाने भुईमूगाचे मोठे नुकसान झाले.