मान्सून लांबला, चिंता वाढली

By Admin | Updated: June 15, 2016 02:43 IST2016-06-15T02:43:51+5:302016-06-15T02:43:51+5:30

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला.

Monsoon longed, anxiety grew | मान्सून लांबला, चिंता वाढली

मान्सून लांबला, चिंता वाढली

अर्धा मृग कोरडा : नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली
यवतमाळ : हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. संपूर्ण रोहिणी आणि अर्धे मृगनक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून आणखी काही दिवस लांबण्याचे संकेत हवामान खात्याने पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी नऊ लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली असून पाणी टंचाईचीही तीव्रताही जिल्ह्यात कायमच आहे.
जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाचा मारा झेलत आहे. नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात आशेचा किरण दाखविला. राज्यासह विदर्भात वार्षिक सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. परंतु मान्सूनचे आगमन लांबले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खाते सांगत आहे. विदर्भात अद्यापही पावसाळी वातावरण तयार झाले नाही. जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु तेही काही तालुक्यापुरताच मर्यादित होता.
जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्यात मान्सून बरसतो. शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागतो. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. यंदाही असेच चित्र सध्या दिसत आहे. रोहिणी आणि अर्धा मृग संपला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आतापर्यंत ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ तीन टक्के आहे. मुबलक पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. मात्र ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी झाली असून त्यात कपाशीची सर्वाधिक लागवड आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असा सल्ला कृषी खाते देत आहे.
हवामान खाते, स्कायमेटने यंदा पाऊस वेळेवर येईल असे भाकित वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळाच्या नैराश्यातून शेतकरी बाहेर पडला. मोठ्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला. बँकात जाऊन पीक कर्जासाठी धडपड करू लागला. अवकाळी पाऊस कोसळल्याने आशा पल्लवीत झाल्या. कृषी केंद्रात बियाण्यांची चाचपणी सुरू झाले. परंतु १४ जूनपर्यंतही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Monsoon longed, anxiety grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.